निसर्गाच्या कुशीत वसलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील तीर्थक्षेत्र रामिलग देवस्थान परिसरातील धबधबा यंदाही खळखळून वाहू लागला आहे. मागील तीन वर्षांपासून अल्प पर्जन्यमानामुळे अधिक दिवस न वाहिलेला हा धबधबा यंदा श्रावण महिन्यापूर्वीच खळखळून वाहू लागल्याने पर्यटक व भाविक धबधब्याखाली मनसोक्त भिजण्याचा आनंद घेत आहेत.

येडशी येथील श्रीक्षेत्र रामिलग देवस्थान हे रामायणातील पौराणिक घटनांची साक्ष असलेले देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. उस्मानाबाद शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील रामिलग हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या अभयारण्याच्या मधोमध हे देवस्थान असल्यामुळे पर्यटक आणि भाविकांची येथे गर्दी होते.

अभयारण्यात बांधण्यात आलेल्या या मंदिराचा परिसर पावसाळय़ात हिरवाईने नटलेला असतो. दरवर्षी श्रावण मासातील पहिल्या सोमवारपासून या देवस्थानची यात्रा भरते. त्यामुळे भाविक व पर्यटकांच्या संख्येत श्रावणात मोठी भर पडते. रामिलग मंदिराला वळसा घालून वाहणारी नदी, मंदिराच्या पाठीमागे कोसळणारा नयनरम्य धबधबा आणि अभयारण्यातील डोंगराच्या अंगाखांद्यावर असलेल्या हिरव्यागर्द झाडीमध्ये इकडून तिकडे वावरणारी माकडे, असे निसर्गरम्य वातावरण सध्या आहे. यंदा मागील दीड महिन्यात चांगला पाऊस झाल्याने हा धबधबा वाहू लागला आहे.