देवगिरी महोत्सवामध्ये परिसंवादातील सूर

आभासी विकास विकण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. औद्यागिकीकरणातून अधिक रोजगार मिळेल, असे पूर्वी सांगितले जायचे. मात्र, या पुढे उद्योगातूनही रोजगार निर्मिती होणार नाही, हे समजून मराठवाडय़ाचा विकास करायचा असेल तर येथील शेतीचा विकास, असे नवे सूत्र मांडण्याची आवश्यकता असल्याचा सूर ‘मराठवाडय़ाचा सर्वागीण विकास आणि आव्हाने’ या परिसंवादामध्ये उमटला. देवगिरी महोत्सवामध्ये या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. भालचंद्र कानगो, विजय दिवाण, सुभाष माने, संजीव उन्हाळे यांनी या विषयावर मत मांडले. परिसंवादाचा समारोप अध्यक्ष विजयअण्णा बोराडे यांनी केला.

मराठवाडय़ाचा विकास करायचा असेल तर उद्योग वाढायला हवेत, अशी मांडणी पूर्वी आंदोलनातून केली जात असे. युवक क्रांती दल, मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून केलेली ही मागणी त्या काळी योग्य होती. मात्र, आता ही मागणी विकासासाठी पुरेशी नसल्याची जाणीव होत आहे. तेव्हा केलेली मागणी चुकीची होती, असे जरी मान्य केले तरी नव्याने विकासाची मांडणी करताना आमच्या भागातील शेतीचे प्रश्न सोडविणे म्हणजे शेतीचा विकास करणे, अशा नव्या मागणीचे आंदोलन उभे राहण्याची गरज भालचंद्र कानगो यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, सध्याच्या विकासाच्या प्रारूपातच चुका आहेत. मोठे उद्योग थाटूनही पुरेसा रोजगार निर्माण होणार नाही. त्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. देशात आणि परदेशातही आता उद्योगातून सर्वाना रोजगाराच्या संधी मिळणार नाहीत. त्यामुळे मराठवाडय़ाच्या विकास करायचा असेल तर येथील शेतीचा विकास करणे, असे सूत्र मांडून काम करावे लागेल. त्यासाठी शेतीमधील रोजगाराचे आकर्षण निर्माण होईल, अशी धोरणे आणि वातावरण निर्मितीसाठी आंदोलने उभी राहण्याची आवश्यकता आहे. सध्या या क्षेत्रात संधीची शक्यताही आहे, मात्र उद्योगधंद्याला लागणारे कच्च्या मालाचे केंद्र म्हणून पाहण्याऐवजी ही रोजगार देऊ शकणारी सक्षम यंत्रणा म्हणून त्यात गुंतवणुकीची गरज असल्याचे मत कानगो यांनी व्यक्त केले. त्यांच्या या मांडणीचा धागा पकडून परिसंवादाचे अध्यक्ष विजयअण्णा बोराडे म्हणाले, शेतीला कॉर्पोरेट क्षेत्राकडे वर्ग करण्याचा प्रयत्न वेगाने केले जात आहे. सहकार मोडीत निघाल्याने आणि पशुसंवर्धनाकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने शेतीमध्ये समस्या वाढल्या आहेत. पण या क्षेत्रात खूप काही करता येण्यासारखे आहे. जालना जिल्हय़ातील कडवंची गावाचे उत्पन्न मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. करता येण्यासारखे खूप आहे, मात्र संघटितपणे तरुणांनी संघर्ष केला नाही तर पुढच्या पिढीचे भवितव्य धोक्यात  असणार आहे. शेतीला मिळणाऱ्या हक्काचा पाण्याचा लढा उभा केला जातो. पाणी जायकवाडीपर्यंत येईपर्यंत सर्व स्तरावर चर्चा होते, मात्र हे हक्काचे पाणी खालच्या भागातील शेतकऱ्यांपर्यंत मिळाले नाही तर त्याचा उपयोग काय? भंडारदऱ्यातून पाणी हक्काचे म्हणून आणायचे आणि ते जायकवाडीमध्ये तुंबवून ठेवायचे. याला विकास कसे म्हणता येईल, असा सवाल त्यांनी केला.  मराठवाडय़ाच्या विकासाच्या टप्प्यात विध्वंस करणारा विकास हवा आहे काय, असा प्रश्नही उपस्थित करण्याची गरज असल्याचे ज्येष्ठ पर्यावरणविषयक तज्ज्ञ विजय दिवाण यांनी सांगितले. ज्या शहरांचा अमर्याद विस्तार होतो तेथे पाण्याचे प्रश्न निर्माण झाल्याचेही ते म्हणाले. या वेळी पत्रकार संजीव उन्हाळे यांनी मराठवाडय़ातील राजकीय पोकळी आणि न होणारा विकास यावर भाष्य केले. तर सुभाष माने यांनीही सहकार क्षेत्रात पिछेहाट झाल्याने मराठवाडा मागास असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान इंगळे यांनी केले.