न्यायालयीन भरती प्रक्रियेवर पवारांचे मिश्कील भाष्य; बी. एन. देशमुख  यांचा सत्कार

‘दिल्लीत अशी चर्चा आहे की, केवळ ४० कुटुंबातूनच न्यायाधीशांच्या नेमणुका होतात. निम्मे अध्रे न्यायाधीश या कुंटुंबाशी संबधित असतात’, असे मिश्किलपणे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी न्यायालयात होणाऱ्या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे केले. औरंगाबाद येथे माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात त्यांनी न्यायव्यवस्थेला बरेच उपरोधिक टोमणे मारले. या वेळी व्यासपीठावर माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, केरळ उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अरविंद सावंत यांची उपस्थिती होती.

बी. एन. देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना शरद पवारांनी आज न्यायालयाला उपरोधिक टोमणे मारण्याची एकही संधी सोडली नाही. ते म्हणाले, ‘‘मी मुख्यमंत्री असताना मुख्य न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्र्यांना न्यायाधीश नियुक्त्यांचे अधिकार होते. तेव्हा या कामात कधी मतभेद झाले नाहीत. मात्र, एकेदिवशी न्यायालयाने सांगितले, ‘मुख्यमंत्र्यांना या भरती प्रक्रियेतून वगळय़ात आले आहे’. न्यायालयाने सांगितले म्हटल्यावर पुढे काय बोलणार? अलीकडे असे ऐकले की, न्यायाधीशांच्या नेमणुका आता केवळ ४० कुटुंबातच आहेत. त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचे ज्युनिअर यांचीच भरती होते. तसे यातले फार काही माहीत नाही; पण अशी चर्चा आहे.’’ असे पवारांचे वाक्य संपते न सपते तोच व्यासपीठावर उपस्थित बी. जी कोळसे पाटील खाली बसूनच म्हणाले, ‘राजकारणातही अशीच स्थिती आहे.’ त्यावर तेवढय़ाच उत्स्फूर्तपणे पवार म्हणाले, ‘आम्हाला दर ५ वर्षांला बदलता येते. तुम्हाला कसे बदलणार?’ त्यांच्या या वाक्यानंतर सभागृहात एकच हशा झाला.

आम्ही या पदावर राहण्यासाठी लोकांचा आमच्यावरचा विश्वास वाढावा म्हणून ज्या काही क्लृप्त्या करतो, त्या करतोच. असे सांगत न्यायालयीन भरतीप्रक्रियेवर मिश्किल भाष्य केले.

केवळ एवढय़ा वक्तव्यावर पवार थांबले नाहीत. त्यांनी न्यायमूर्ती लोढा समितीच्या चौकशीची आणि शिफारशींचीही टर उडवली. बीसीसीआयच्या कारभाराची तपासणी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. ‘आमच्याकडे क्रिकेटचाही कारभार आहे. तो कसा चालतो बघा म्हणून एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. सहा महिन्यांपासून ते कागदपत्रे तपासात आहेत. त्यांनी सगळी कागदपत्रे पाहिली आणि नुकतेच ‘साडेतीन कोटी’ रुपयांचे बील पाठविले. ‘जास्त नाही!’ असे ते खुमासदारपणे म्हणाले. त्यामुळे सभागृहात पुन्हा हशा पिकला. पवार यांनी भाषणात पुन्हा टोपी उडविणे चालूच ठेवले. या समितीने विचारणा केली, जेव्हा सामने नसतात तेव्हा तुम्ही या मैदानाचे काय करता? असा प्रश्न विचारून त्यांनी शिफारस केली की, क्रिकेटच्या मदानावर टेनिस किंवा अन्य खेळ का खेळू देत नाही. यावर आता बोलायचे कोणी, असा उपरोधिक सूर लावत ते म्हणाले. आता क्रिकेटच्या मैदानावर कुस्तीसाठी हौदा उभारा म्हणाल, तर काय बोलणार? जास्त बोलता येत नाही. ती याचिका आता चालू आहे. पण ठीक आहे. वाट बघतोय. असे म्हणत पवार यांनी न्यायालयाच्या कामकाजावरही मार्मिक भाष्य केले. भाषणाच्या शेवटी न्यायालयाचे विकासात योगदान निश्चित आहे. पण परस्परांबद्दल आदर बाळगून सर्वसामान्य माणसांच्या हिताचे काम करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. न्या. बी. एन. देशमुख यांच्या कार्यकतृत्वाचा आदरपूर्वक उल्लेख करून त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. या सत्कार कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण होते.

‘न्या. बी. एन.’ या बी. एन. देशमुख यांच्यावरील पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनही पवार यांच्या हस्ते करण्यात आले.