कोपर्डीसारख्या घटनांच्या विरोधात जनमानस तयार होत आहे. त्याच्या प्रतिक्रिया बघायला मिळू लागल्या आहेत. या सगळय़ांची जाण ठेवून काम करण्याची आवश्यकता आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमार्फत असे काम राजकीय अभिनिवेशाशिवाय केले जात आहे. यापुढेही ते सुरू राहील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या औरंगाबाद केंद्राच्या दशकपूर्ती सोहळय़ानिमित्त ते बोलत होते. या वेळी मराठवाडय़ाच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या १० मान्यवरांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने विविध प्रकारचे काम हाती घेतले जात आहे. त्यात औरंगाबादच्या केंद्राचे काम उत्तम प्रकारे चालले असल्याचे सांगत प्रतिष्ठानच्यावतीने घेण्यात येणाऱ्या युवती मेळाव्यांचा उल्लेख करत पवार म्हणाले, की आज दुर्दैवाने मुलींवर अत्याचार होत आहेत. त्या विरोधात जनमानस तयार करण्याची भूमिका राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून करायला हवी. कोपर्डीसारख्या घटनेनंतर महिला व मुलींच्या ज्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या, त्याची जाण ठेवून यापुढे काम करावे लागेल. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने या वेळी विजयअण्णा बोराडे, त्र्यंबक महाजन, डॉ. द्वारकादास लोहिया, डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. माधवराव चितळे, डॉ. आर. पी. भागवत, नागनाथ फटाले, दुलारी कुरेशी, प्रा. दिनकर बोरीकर, पद्मश्री फातिमा झकेरिया यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती.

यशवंतरावांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना शरद पवार यांनी त्यांचा आत्मविश्वास आणि वैचारिक जडणघडण कशी झाली, याची माहिती दिली. ते म्हणाले, लहानपणी यशवंतराव चव्हाणांना शिक्षकांनी विचारले होते, ‘तुम्ही कोण होणार?’ तेव्हा त्यांनी ‘मी यशवंतराव चव्हाण होणार’ असे उत्तर दिले. आपले व्यक्तिमत्त्व समाजासाठी आदर्श असावे, असा आत्मविश्वास त्यांच्या या वक्तव्यात होता. त्यांच्या वैचारिक जडणघडणीच्या काळात सत्यशोधक उभारणीची चळवळ मोठी जोमात होती. हा विचार जरी योग्य असला तरी त्याहीपेक्षा अधिक पारतंत्र्यातून बाहेर पडणे अधिक महत्त्वाचे वाटल्याने त्यांनी स्वातंत्र्यलढय़ात सहभाग घेतला. पुढे मुख्यमंत्री आणि देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम आजही महत्त्वपूर्ण ठरते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांच्यावर मोठी टीका झाली. प्रमुख वर्तमानपत्रात त्यांचा उल्लेख सूर्याजी पिसाळ असाही केला गेला, मात्र तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबर राहून संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा आग्रह न सोडता त्यांनी काम केले आणि पुढे महाराष्ट्राची निर्मिती १९६० साली झाली. गृहमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाबाबतच्या आठवणीही खासदार पवार यांनी सांगितल्या. मराठी माणसाची सांस्कृतिक उंची वाढविण्याचे काम त्यांनी केले. असे सांगत पवार यांनी संसदीय कार्यपद्धतीवर यशवंतरावांचा कसा विश्वास होता, हे आवर्जून सांगितले. मराठवाडय़ावरही यशवंतरावांचे प्रेम होते, असे सांगत सर्वसामान्य माणसांसाठी धोरणे आखण्याची जबाबदारी त्यांनी कशी पार पाडली, याची माहिती उपस्थितांना दिली. यशवंतरावांचा वाचनाचा दांडगा व्यासंग आणि सार्वजनिक जीवनात कसा आदर्श असावा, हे त्यांनी दाखवून दिल्याचे सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम पोतदार यांनी महात्मा फुले यांनी लिहिलेल्या अखंडाच्या गायनाने केली. प्रास्ताविक नंदकिशोर कागलीवाल, सूत्रसंचालन महेश अचिंतलवार व नीलेश राऊत यांनी केले. कार्यक्रमास आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, भाऊसाहेब चिकटगावकर, राजेश टोपे, मधुकरअण्णा मुळे, सचिन मुळे, सुहास तेंडुलकर, दत्ता बाळसराफ, दीपा क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.