शरद पवार यांचा इशारा; उसासाठी ठिबकच्या दुरुस्तीची तयारी

उसाला पाणी देण्याच्या प्रक्रियेत ठिबकची दुरुस्ती करण्यास तयार असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्जमाफीसाठी ५ जूनला रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा सोमवारी केंद्र आणि राज्य सरकारला दिला. ठिबकसाठी योग्य अनुदान आणि वीजबिलात माफी दिल्यास सरकारला सहकार्य करायला तयार आहोत. मात्र, गुरेढोरे आणि माणसे उपाशी राहात असतील, तर रुमणे घेऊन सरकारला धोपटून काढू, या शब्दांत पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारांचा समाचार घेतला.

येथील देवगिरी महाविद्यालयात आयोजित दुष्काळ परिषदेत ते बोलत होते. उसामुळे दुष्काळ पडतो आणि शरद पवार हे साखर कारखानदारीस प्रोत्साहन देतात, असे दिल्लीत सांगितले जाते. ५० वर्षांपासून या भागात ऊस घेतला जात आहे. पैठण, सिल्लोड, हिंगोली, जालना भागांत कारखाने काढल्यानंतरही कधी दुष्काळ जाणवला नाही. निसर्गाचा प्रकोप झाल्यानंतर उसाला जबाबदार ठरविले जात आहे. उसाच्या पाण्यात दुरुस्ती करायला तयार आहोत. १२ महिन्यांच्या या पिकाला ४८ पाळय़ा पाणी दिल्याचे सांगितले जाते, मात्र ते खरे नाही. तरीदेखील ठिबकला अनुदान दिल्यास आणि विजेची माफी केल्यास सरकारला सहकार्य करायची तयारी असल्याचे पवार म्हणाले.

कर्जमाफी, परीक्षाशुल्कात माफी, तसेच खरिपात बी-बियाणे आणि खत सरकारने दिले नाही, तर ५ जूनपासून रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. प्रसंगी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा, असेही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने जिल्हय़ातील १४६ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना १५ हजार रुपयांची मदत या वेळी करण्यात आली.

अजित पवारांची उपस्थिती, पण..

दुष्काळी परिषदेला मराठवाडय़ासह राज्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते. धनंजय मुंडे, पद्मसिंह पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, जयंत पाटील, जयदत्त क्षीरसागर, राजेश टोपे, नवाब मलिक, फौजिया खान या नेत्यांच्या रांगेत अजित पवारही आवर्जून उपस्थित होते, मात्र दुष्काळी परिषदेत शरद पवारांच्या भाषणापूर्वी अजित पवारांचे भाषण मात्र झाले नाही.