जिल्ह्यत इतर पक्षातील अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली आहे. आता उमेदवारीवरून शिवसेनेत चांगलीच धुसफूस सुरू झाली आहे. एका शिवसनिकाची तर बाजार समितीचे सभापती रामेश्वर शिंदे व शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख पंडित शिंदे यांच्यात खडाजंगी झाली. त्यानंतर वारंगा येथील बठकही गाजली. जुन्या निष्ठावान सनिकांऐवजी नव्या उपऱ्यांना अधिक भाव दिला जात असल्याने निवडणुकीच्या तोंडावर जुन्या शिवसनिकात नाराजीचा सूर दिसत आहे.

जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहात शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते जि. प. चे माजी अध्यक्ष राजेश पाटील गोरेगावकर, नंदकुमार नायक यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. तर काही महिन्यांपूर्वी भाजपातून शिवसेनेत दाखल झालेले प्राचार्य पंडित शिंदे यांना जिल्हा सहसंपर्क प्रमुख हे पद मिळाल्याने त्यांनी गावागावात कार्यक्रम घेऊन शिवसेनेत अनेकांचे प्रवेश करवून घेतले.

जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला वातावरण पोषक असल्यामुळे जुने निष्ठावान शिवसनिक निवडणुकीत आपल्यालाच उमेदवारी गृहीत धरून प्रचार कामाला लागले होते. परंतु भांडेगाव गटातून जुन्या निष्ठावान सनिकांनी उमेदवारी नाकारल्याने जिल्ह्याचे संपर्कमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समक्ष बाजार समितीचे सभापती रामेश्वर शिंदे व जिल्हा सहसंपर्क प्रमुख पंडित शिंदे यांच्याशी चांगलाच वाद घातला.

दोन दिवसांपूर्वी कळमनुरी तालुक्यातील वारंगा भागात निवडणूक उमेदवारी निमित्त शिवसेनेची बठक झाली. या बठकीतही जुन्या निष्ठावान शिवसनिकांना विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. यातून बराच वाद झाला.

जिल्हा प्रमुखांनी अद्याप उमेदवारी जाहीर झाली नसल्याचा खुलासा केल्याने वातावरण काहीसे निवळले. काही निष्ठावान सनिकांनी तर आम्ही मातोश्रीवर जाऊन आमच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागणार असल्याचा इशारा दिला आहे.

शिवसेनेंतर्गत वास्तविक चित्र पाहता माजी आमदार गजाननराव घुगे व जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे. त्यात भाजपातून शिवसेनेत दाखल झालेले व जिल्हा सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्त झालेले  पंडित शिंदे व त्यांच्या सोबतीला बाजार समितीचे सभापती रामेश्वर शिंदे या एकूण वरिष्ठ शिवसनिकात अंतर्गत मतभेद आहेत. म्हणूनच उमेदवारी देण्याचा वाद हा त्यासाठी कळीचा मुद्दा असल्याची चर्चा आहे.