शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती मोहिमेअंतर्गत जिल्ह्य़ात शिवसेनेच्या वतीने नद्या-ओढय़ांचे १११ किलोमीटर लांबीचे खोलीकरण-रुंदीकरण करण्यात आले. या संदर्भातील कामाचा अहवाल आमदार अर्जुन खोतकर यांनी जिल्ह्य़ातील पक्ष पदाधिकाऱ्यांसमवेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर केला.

पक्षाने उपलब्ध करून दिलेले पोकलेन आणि खोतकर यांनी दिलेल्या यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून जिल्ह्य़ातील मोतीगव्हाण, मानेगाव, मूर्ती, बाजी उम्रद, पखारी, नाव्हा, माळशेंद्रा, कडवंची, कुंभेफळ, गोलापांगरी, बठाण, नंदापूर, धारकल्याम, गवळी पोखरी, साळेगाव आदी गावांमधील नद्या-ओढय़ांचे रुंदीकरण, खोलीकर करण्यात आले. शासकीय दराने ही कामे केली असती तर त्यासाठी १० कोटींपेक्षा अधिक खर्च आला असता. दीड हजार एकरपेक्षा अधिक शेती यामुळे सिंचनाखाली येऊ शकते, असे या वेळी सांगण्यात आले.

खोतकर यांच्या पुढाकारातून जालना शहरात औरंगाबाद रस्त्यावरील नदीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने बंधारा बांधण्यात आला. त्यानंतर ग्रामीण भागातील नदी-नाल्यांच्या खोलीकरण, रुंदीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती मोहिमेअंतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या कामाची दखल घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी पोकलेन मशीन उपलब्ध करून दिल्यानंतर कामास गती आली. ठिकठिकाणच्या ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग दिल्यामुळे अनेक गावांत प्रत्यक्ष कामे झाली. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते पोकलेन मशीनचा प्रारंभ झाला. त्यावेळी शेतक ऱ्यांच्या मेळाव्यात नदी-ओढय़ांच्या खोलीकरणाचे महत्त्व सांगणारी भाषणे झाली. जिल्ह्य़ातील नद्या-नाल्यांचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम यापुढेही चालू राहणार असल्याचे सांगण्यात आले.