मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या वतीने आयोजित औरंगाबादेत व्याख्यानासाठी आलेले राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या गाडीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाठीमागून दगडफेक केली. दुपारी साडेचारच्या सुमारास मराठवाडा महसूल प्रबोधिनीसमोर ही घटना घडली. महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात अणे यांचे व्याख्यान नंतर होऊ शकले नाही. ते परतले. यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. ‘महाराष्ट्र एकसंध राहिलाच पाहिजे’, ‘१०५ हुतात्म्यांचे स्मरण ठेवा’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या. या घटनेनंतर अणे आम्हाला दिसलेच नाही. त्यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केली, अशी भूमिका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मांडली.

मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथ्रीकर, मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख, गुणवंत हंगरगेकर, प्रा. बाबा उगले यांच्या पुढाकाराने श्रीहरी अणे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दुपारी साडेतीनच्या दरम्यान व्याख्यानाला सुरुवात होणार होती. सभागृहात नागरिकांची गर्दी होऊ लागली. याच दरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नगरसेवक राजू वैद्य, नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ यांच्यासह शिवसैनिक, नगरसेविका व महिला कार्यकर्त्यां महसूल प्रबोधिनीसमोर जमल्या. पोलिसांनी शिवसैनिकांना कार्यक्रम स्थळी जाण्यापासून अडविले. ‘जाहीर कार्यक्रम आहे, सर्वानी यावे, असे वृत्तपत्रांत आवाहन आले आहे. त्यामुळे विचार ऐकण्यासाठी आम्ही आलो आहोत,’ अशी भूमिका अंबादास दानवे व राजू वैद्य यांनी पोलिसांसमोर मांडली. अणे महसूल प्रबोधिनीला चिकटून असणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयापर्यंत गाडीने येत होते. त्यांना अडविल्याने गाडी परतत असताना शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर पाठीमागून दगड भिरकावले. त्यामुळे गाडीच्या पाठीमागची काच फुटली. अणेंच्या पाठीमागे अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांचीही गाडी होती. त्यांनी दगडफेकीमुळे काच फुटल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. या घटनेत अणे यांना कोणतीही इजा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सभागृहात गुणवंत हंगरगेकर यांनी दगडफेक झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर स्वतंत्र मराठवाडय़ाची मागणी लावून धरणाऱ्या कार्यकर्त्यांनी भाषणे केली. मागणीचा पुनरुच्चार करताना बाबा उगले म्हणाले, की आम्ही गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा स्वतंत्र झाला पाहिजे, यासाठी सभा घेत आहोत. ही मोहीम कितीही विरोध झाला तरी आम्ही थांबवणार नाही. ते १०५ हुतात्म्यांचा मुद्दा पुढे करून भावनिक ब्लॅकमेलिंग करत आहेत. पण आम्ही काहीही झाले तरी हा मुद्दा सोडणार नाही. या वेळी शेतकरी संघटनेचे श्रीकांत उमरीकर यांचेही भाषण झाले. त्यांनी आंदोलनाचा भाग म्हणून १ मे महाराष्ट्र दिन हा काळा दिवस पाळण्याचे आवाहन केले. तसेच १७ सप्टेंबरपासून आम्ही स्वतंत्र झालो आहोत, असे स्वत:हून जाहीर करण्याचा कार्यक्रम मराठवाडा मुक्ती मोर्चाने हाती घ्यावा, अशी सूचना केली. या वेळी  व्यासपीठावर भगवान कापसे यांचीही उपस्थिती होती.