डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेच्या दृष्टिकोनातून बौध्द धर्म स्वीकारत सर्वाना एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला तरी आजही दलित समाजातील उपजातींमध्ये रोटी-बेटीचे व्यवहार होत नाहीत. अन्याय, अत्याचारांच्या घटनेमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे समानतेच्या विचाराला प्रेरित होऊन जिल्ह्यातील सहाशे कुटुंबांनी बौध्द धर्माची दीक्षा घेतली आहे. दीक्षा घेतलेल्या कुटुंबांमध्ये आता रोटी-बेटीचा व्यवहार केला जाईल, अशी माहिती रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी दिली.
रविवारी बौध्द धम्म दीक्षा सोहळा निमित्ताने आनंदराज आंबेडकर येथे आले होते. कार्यक्रमापूर्वी पत्रकार बठकीत बोलताना ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जिल्ह्यातील सहाशे कुटुंबांनी बौध्द धम्म दीक्षा घेतली. यातून सामाजिक समता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दीक्षा स्वीकारलेल्या विविध जाती, पोटजातीतील कुटुंबांमध्ये रोटी-बेटी व्यवहार केला जाईल. एकविसाव्या शतकातही दलितांवरील अन्याय, अत्याचार वाढत आहेत ही शोकांतिका असून त्यांना आधार देण्याची जबाबदारी शासनाची असल्याचे त्यांनी सांगितले. गायरानाच्या जागेवरून ठिकठिकाणी वाद सुरू आहेत. अनेक वर्षांपासून जमीन कसणाऱ्यांना नाहक त्रास दिला जात असून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी परभणी येथे २९ फेब्रुवारी रोजी मराठवाडास्तरीय गायरान परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली. परंतु सत्ता चालवणारे त्यांच्या विचारांच्या विरोधात कार्य करत असल्याने देशात त्यांच्या विचारावर चालणारा पक्ष सत्तेवर यावा ही प्रामाणिक इच्छा समोर ठेवून त्या दृष्टीने प्रयत्न केले जात असून आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांनी आपली पोटे भरण्यासाठी नेत्यांना तयार केले. अशा धंदेवाईक कार्यकर्त्यांना समाजच त्यांची जागा दाखवेल. जुन्या पिढीने, कार्यकर्त्यांनी आंबेडकरी चळवळीच्या पाठीत खंजीर खुपसल्याने आता त्यांच्यावर विश्वास राहिला नसल्याचे सांगून नव्या पिढीकडून, कार्यकर्त्यांकडून मोठय़ा अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. यावेळी राज्यसरचिटणीस संजीव बोधनकर, जीवन गायकवाड, दादासाहेब जोगदंड यांची उपस्थिती होती.