योगेश भाऊसाहेब दांडगे यांची २४ एकर शेती. २३ वर्षांपूर्वी औरंगाबाद तालुक्यातील वरुडकाजी गावातील या शेतकऱ्याची १४ एकर जमीन पाझर तलावासाठी संपादित झाली. त्याला मावेजा कमी मिळाला म्हणून न्यायालयात एक प्रकरण सुरू आहे. आता त्यांची समृद्धी महामार्गामध्ये आठ एकर जमीन जाणार आहे. उरली जमीन केवळ दोन एकर. या जमिनीतून येणाऱ्या उत्पन्नावर आता आई, वडील, पत्नी, मुले यांचे भरणपोषण करायचे कसे, असा त्यांचा सवाल. जगायचे कसे, असा सवाल करणारे अनेक शेतकरी शुक्रवारी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना भेटले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज अशा शेतकऱ्यांना एकत्रित करून धरणे आंदोलनही करण्यात आले.

योगेश दांडगे काही एकटे शेतकरी नाहीत की जे उद्ध्वस्त होतील. औरंगाबाद तालुक्यातील पळशी गावातील कानापूर शिवारात दामोदर शेळके हे अल्पभूधारक शेतकरी. शेतात वेगवेगळय़ा भाज्या पिकवायच्या आणि उदरनिर्वाह करायचा. त्यांचे बरे चालले आहे. नुकताच त्यांनी भोपळा लावला. दिवसाला औरंगाबादला ते भोपळय़ातून हजार रुपये मिळवितात. शेतात चांगले घरही बांधले आहे. पण शेळके आता कमालीचे घाबरले आहेत. कारण त्यांची सगळीच जमीन समृद्धी महामार्गात जाणार आहे. पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा सगळा परिवार कशाच्या भरवशावर पोसायचा? रस्त्यासाठी जमीन दिल्यावर मोबदला मिळेलही, पण ज्यांना शेत विकायचेच नाही, त्यांच्या शेतीचे भाव कशासाठी केले जात आहेत? कोणाची पूर्ण शेती जाणार तर बडा शेतकरी अल्पभूधारक होणार आहे. त्यामुळेच शुक्रवारी आंदोलनात शेतकरी घोषणा देत होते, ‘समृद्धी नव्हे बरबादी’, ‘बरबादी महामार्ग रद्द करा!’ औरंगाबाद व जालना जिल्हय़ातील या महामार्गाच्या संयुक्त मोजणीसाठी अलीकडेच अधिकाऱ्यांनी आठ पथके नेमली आहेत.

एका पथकात दोन संघ. एक खासगी एजन्सीचा, एक सरकारी अधिकाऱ्यांचा. ही खासगी एजन्सी कशासाठी? अब्दीमंडीतील सुभाष बरडे सांगत होते, या एजन्सीतील लोक खोटेनाटे आश्वासन देतात. रेडीरेकनरचा दर आणि बाजारमूल्याचा दर यात कमालीचे अंतर आहे.

मुळात संमती न घेता संयुक्त मोजणी केलीच कशी जाते? औरंगाबाद जिल्हय़ातील गंगापूर तालुक्यातील जहागीरवरुड, कच्ची घाटी, शेंद्राबन, पळशी येथील जमीन बागायती आहे. डाळिंब, द्राक्ष, मोसंबीच्या बागा आहेत. मात्र आमच्या शेतातूनच रस्ता जाणार असल्याचे जाहीर केल्याने आता मोबदल्याच्या जिवावर जगायचे का? मोबदला वाढवून मिळावा म्हणून आंदोलने होतात, असा सरसकट आरोप अधिकाऱ्यांकडून केला जातो. मात्र प्रश्न मोबदल्याचा नाही तर जगण्याचा आहे, असे शेतकरी सांगतात. या रस्त्याच्या भोवताली बडय़ा अधिकाऱ्यांनी जमिनी घेतल्या आहेत. त्यांना त्यांचा विकास हवा आहे, त्यासाठी आमच्या जमिनी घेतल्या जात आहेत. मुळात सहमती नसताना केली जाणारी संयुक्त मोजणी थांबवावी, अशी विनंती समृद्धी महामार्गविरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आली. भाकपचे राम बाहेती, नागपूरहून या आंदोलनातील शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी आलेले भाकपचे तुकाराम भस्मे यांनी समृद्धीची वाट कशी शेतकरीविरोधी आहे, याचे विवेचन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यासमोर केले.

  • मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी पूर्वीचे दोन रस्ते आहेत. एका रस्त्याचे भूसंपादनही झालेले आहे. मग नवीन मार्गासाठी अट्टहास का, असा सवालही शेतकरी करीत आहेत.