बालकामगार अधिनियमांतर्गत जिल्ह्यात जानेवारीमध्ये तब्बल ३८ गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. या स्माईल २ मोहिमेत १५० बालकामगारांची सुटका करण्यात आली.
हरवलेल्या, तसेच अनाथ, बालकामगारांचा शोध घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून जिल्हा पोलीस दलाने मुंबई येथील जस्टिस अँड केअर या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने १ ते २९ जानेवारी दरम्यान स्माईल २ या नावाने संयुक्त मोहीम राबवली. हॉटेल, दुकाने, गॅरेज अशा ठिकाणी तपासणी केली. जेथे कोठे बालकामगार आढळले तेथे त्यांची सुटका करून संबंधित मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. बालकामगारांच्या पालकांकडून पुन्हा कामाला पाठविले जाणार नाही, अशी लेखी हमी घेतली. सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती एस. के. नाईक यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या मोहिमेत तब्बल १५० बालमजुरांचा शोध घेण्यात आला. ही सर्व मुले १४ ते १८ वर्षे वयोगटातील आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दिली. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत ३८ गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलीस ठाणेनिहाय बालमजुरांची संख्या : पूर्णा १२, गंगाखेड ९, पाथरी १२, जिंतूर १७, सेलू २०, मानवत ४, कोतवाली ४६, नानलपेठ १३, नवामोंढा १५. एकूण १५० बालकामगारांची सुटका करण्यात आली. यातील केवळ मुले शिक्षण घेण्यासाठी बालसुधारगृहात राहण्यास तयार झाली आहेत. यातील १० मुले परराज्यातील आहेत.
पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला कक्षाने २०१५ मध्ये ६४ संसार पुन्हा जुळविले. कौटुंबिक वादातून विभक्त होण्याच्या मार्गावर असणाऱ्या दोन्ही कुटुंबांचे या कक्षाने प्रबोधन केले. शहरासह ग्रामीण भागात घरफोडय़ा होऊ नयेत, या साठी स्थानिक पोलीस मित्रांच्या मदतीने रात्रीची गस्त वाढविण्यात येणार असल्याचेही ठाकर यांनी सांगितले. या वेळी पत्रकार प्रसाद आर्वीकर यांना पोलीस मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोबतच तंटामुक्त मोहिमेतील पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही पोलीस दलास सहकार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस निरीक्षक संजय हिबारे, श्रीमती नाईक यांची उपस्थिती होती.
पोलीस दलाचे अॅप कार्यान्वित
आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी जिल्हा पोलीस दलाने अँड्रॉईड अॅप तयार केले आहे. याद्वारे पोलीस नियंत्रण कक्षाशी थेट संपर्क तसेच संदेश पाठवता येऊ शकतो. संदेश येताच तत्काळ संबंधिताला मदत पोहोचण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित होईल. संकटात सापडल्याची माहिती दूरध्वनीवर देता येत नसल्यास अशा स्थितीत या अॅपद्वारे नुसता संदेश मिळाला, तरी जीपीएस यंत्रणेद्वारे संबंधित ठिकाणावर पोलीस यंत्रणा पोहोचणार आहे.
‘पुर्णेतील व्यापाऱ्यांनी घाबरू नये’
पूर्णेत वारंवार दगडफेक, दंगलीच्या घटना घडत आहेत. यामुळे तेथील अनेक व्यापारी भयभीत होऊन स्थलांतर करण्याच्या वाटेवर आहेत. व्यापाऱ्यांनी घाबरू नये. पोलीस दल अशा घटना थांबविण्यास सक्षम आहे, असे ठाकर यांनी स्पष्ट केले. पूर्णेतील मुख्यालयी राहणे पोलिसांना बंधनकारक केले असून पोलीस ठाण्यात शस्त्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. वारंवार अशांतता पसरविणाऱ्यांना तडीपार केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.