येत्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. मराठवाडय़ातील ५४ लाख १८ हजार हेक्टर क्षेत्रापैकी या वर्षी १० लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन लागवड होईल, असा अंदाज आहे. त्यासाठी ६ लाख १७ हजार क्िंवटल सोयाबीन बियाण्याची आवश्यकता आहे. उपलब्ध बियाण्याच्या तुलनेत १ लाख २० हजार क्विंटल बियाण्याचा तुटवडा भासू शकतो, असे कृषी विभागाला वाटते. विशेषत: लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्य़ांत सोयाबीनची लागवड वाढली आहे.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडे १ लाख ८० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध असू शकते. महाबीज व राष्ट्रीय बीज कार्यक्रमांतर्गत १ लाख ७७ हजार बियाणे मिळू शकते. खासगी कंपन्या व इतर ठिकाणांहून १ लाख ४० हजार क्विंटल बियाणे मिळेल, असा अंदाज आहे. उपलब्ध ४ लाख ९७ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध असले, तरी वाढलेले क्षेत्र लक्षात घेता बियाण्यांचा तुटवडा भासू शकतो. गेल्या २० वर्षांत सोयाबीनच्या पेऱ्यात ५ हजार ३०१ टक्के वाढ झाली. पीक पद्धतीत बदल करण्याच्या अनुषंगाने या वर्षी प्रयत्न केले जात आहेत. विशेषत: कडधान्यांचे उत्पन्न वाढावे, असे प्रयत्न सुरू आहेत. तूर, मूग, उडीद यापैकी मूग व उडीद पिकांसाठी पहिल्या टप्प्यात चांगला पाऊस झाला तरच पेरणी वाढते. अन्यथा ही पिके शेतकरी घेत नाही.
खरीप हंगामासाठी नियोजन केले जात असून सोयाबीन आणि कापूस या दोन्ही बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत प्रशासन साशंक आहे. गेल्या ३ वर्षांपासून पडत असणाऱ्या सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली. त्यामुळे बियाण्यांचा तुटवडा कसा कमी करायचा, याकडे कृषी विभाग लक्ष देत आहे. मात्र, उपलब्धतेच्या प्रमाणात बियाण्यांचा तुटवडा असल्याची माहिती कृषी विभागाने सरकारला दिली.