संप शंभर टक्के यशस्वी; प्रवाशांना दुप्पट भरुदड

राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहक व कर्मचारी, अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सर्वच संघटनांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग घेतला असून संप शंभर टक्के यशस्वी होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. संप प्रथम दर्शनी वेतनाच्या प्रश्नावर असला तरी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या शिवशाहीच्या व एसटीच्या चालकाच्या वेतनातील तफावतीचा प्रश्न, प्रत्येक एसटीसाठी २५ हजार रुपये याप्रमाणे राज्यातील १८ हजार एसटींवर खर्च करण्याच्या निर्णयाविरुद्ध कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष मंगळवारी पाहायला मिळाला. दरम्यान, संपामुळे सर्वच ठिकाणी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांचे अतोनात हाल झाले.

सिडको एसटी स्थानकात विदर्भ व मराठवाडय़ाच्या अन्य भागात येणाऱ्या सुमारे ५६० पेक्षा अधिक एसटी उभ्या होत्या. जागेअभावी काही एसटी या मुकुंदवाडीतील जागेमध्ये उभ्या होत्या. मध्यवर्ती बस स्थानकांतही जवळपास ५०० पेक्षा अधिक एसटी उभ्या होत्या. औरंगाबाद शहरातील सुमारे एक हजारपेक्षाही अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले. संपात शिवसेनाप्रणीत कामगार सेनेसह जवळपास सर्वच संघटनांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग राहिला. कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट त्यांचे नेते तथा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या विरोधातच घोषणाबाजी करून त्यांनी  शिवशाहीच्या चालकांना देण्यात येणाऱ्या १८ हजार रुपये पगाराच्या निर्णयाचा मुद्दा मांडला. कर्मचारी, अधिकारी, वाहक-चालकांनी मिळणाऱ्या वेतनाचे पगारपत्रक, मुक्कामी असताना रात्री जेवणासाठी मिळणारा १२ रुपये भत्ता, अडीचशे किलोमीटर प्रवासानंतर मिळणारे अवघे ९ पैसे वेतनाच्या संदर्भाने दर चार वर्षांनी करण्यात येणारा करार १८ महिन्यांनंतरही झालेला नसल्यामुळे येणाऱ्या अडचणी, १६ महिन्यांनंतर पण तेही व्याज न देता दिलेल्या डीएची रक्कम, एसटीच्या गाडय़ांची अवस्था, याबद्दल संपात सहभागी असणाऱ्यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. औरंगाबादेत शिवसेनाप्रणीत कामगारसेनेचेही पदाधिकारीही होते.

नांदेड- नांदेडमध्येही संपास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शिवसेनाप्रणीत कामगार सेना वगळता सर्व कामगार संघटनांचे सदस्य यात उतरल्याने एसटीची चाके पूर्णपणे थांबली आहेत. ४० पेक्षा अधिक बसेसच्या हवा सोडून देण्यात आल्या. एसटी इंटक, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र मोटार कामगार संघासह विविध एसटी कर्मचारी संघटनांनी बेमुदत संपाची हाक दिली. एकही बस नांदेड आगारातून बाहेर पडू शकली नसल्याची माहिती प्रभारी आगार प्रमुख निम्मनवाड यांनी दिली. आरटीओ व पोलिसांनी खासगी वाहतुकीला विशेष परवानगी दिली आहे. ९ आगारातील ४६३ बस फेऱ्या थांबल्यामुळे सुमारे विभागाचे ५५ लाखांचे नुकसान झाले असून ३२०० हून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाल्याची माहिती प्रभारी विभागीय नियंत्रक पी. एस. नेहुल यांनी दिली.

उस्मानाबाद- उस्मानाबाद विभागातील सर्व आगारातून होणाऱ्या ६०० फेऱ्या थांबल्याने पाऊण कोटीचा फटका बसला असल्याची माहिती आहे. संपात सुमारे अडीच हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत.

बीड- जिल्ह्य़ातील एक कोटींचे उत्पन्न संपामुळे बुडाले आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून काही ठिकाणी स्कूल बसेस आणि अन्य खासगी वाहनांच्या माध्यमातून प्रवाशांची गरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला. खासगी वाहतूक धारकांनी मात्र संपाचा फायदा घेत तिकीट दरात मोठी वाढ केली असून पुणे, मुंबई अशा लांब पल्ल्यांसाठी प्रवाशांकडून जादा तिकीट दर आकारला.

परभणी- परभणी जिल्ह्य़ातून दररोज १ लाख ४० किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या एसटीने मंगळवारी केवळ २०० किमीचाच प्रवास आणि तोही दोन फेऱ्यांत पूर्ण केला. त्यामुळे परभणी विभागाचे ३५ लाखांचे नुकसान झाले आहे. प्रवाशांना गैरसोयीचा फटका बसला. परभणी ते पुणे हे एरवी सातशे रुपयात वातानुकूलित मिळणारे तिकीट आता दीड ते दोन हजार रुपयांच्या घरात जावून पोहोचले आहेत. विभागातील २३८९ पैकी सुमारे २३३० चालक, वाहक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदवला. संपाला स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाकप आदी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

खासगी वाहनधारकांकडून दुप्पट भाडे

एसटीच्या संपामुळे खासगी प्रवासी वाहतूकदार वाहनधारकांनी मंगळवारी अक्षरश प्रवाशांची लूट करत दुप्पट भाडे आकारले. जालन्याचे भाडे ६५ रुपये असताना खासगी प्रवासी वाहतूकदार, ऑटोरिक्षा चालकांनी जालन्यासाठी शंभर रुपये भाडे आकारले. बीडसाठी दोनशे रुपयांपेक्षा अधिक भाडे घेतले जात होते. बीडसाठीचा दर १५० ते १५५ च्या आसपास आहे. मराठवाडय़ातील सर्वच जिल्ह्य़ात खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची अक्षरश लूट सुरू आहे.

विद्यार्थिनी अडकल्या

बीडच्या कालिकानगरात राहणारी अश्विनी दोन दिवसांपूर्वी एमटेकच्या परीक्षेसाठी जळगावला गेली होती. ती एकटीच नव्हती. तिच्यासोबत आणखी दहा विद्यार्थिनीही होत्या. अश्विनीचा सोमवारी पेपर झाला. काही जणींचा मंगळवारी होता. त्यामुळे त्या तेथेच थांबल्या. अश्विनी रात्री निघाली. कशी-बशी औरंगाबादेत आली. सकाळपासून बीडला जाण्यासाठी प्रयत्न करीत होती. मात्र दुपारी २ वाजेपर्यंत तिला वाहन उपलब्ध होऊ शकले नाही. बीडसह उस्मानाबाद, लातूर येथीलही काही विद्यार्थिनी जळगावात अडकल्या आहेत.