मांडखेल येथील आजुबाई विद्यालयातील विद्यार्थ्यांना शनिवारी सकाळी शाळेत आल्यानंतर एकदम मळमळ होऊन अंग खाजू लागल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षकांनी तत्काळ ४४ विद्यार्थ्यांना परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय उपचारानंतर सायंकाळी सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले. राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत १० फेब्रुवारीला या मुलांना गोळ्या देण्यात आल्या होत्या, त्यातून हा प्रकार झाल्याचा संशय आहे. मात्र गोळ्यांचा परिणाम हा दहा तासांपर्यंत असतो, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. यापूर्वीही केज आणि पाटोदा तालुक्यात जंतनाशक गोळ्या दिल्यानंतर मुलांना मळमळ होण्याचा प्रकार उघडकीस आला होता.
बीड जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत १ ते १९ वयोगटातील मुला-मुलींना देण्यासाठी अलबेंन्डाझॉलच्या सहा लाख गोळ्या शाळांमध्ये वितरित करण्यात आल्या आहेत. १० फेब्रुवारी रोजी बहुतांशी शाळांमध्ये या गोळ्या मुलांना देण्यात आल्यानंतर सुरुवातीला डोंगरकिन्ही (ता. पाटोदा) येथील शाळेतील आणि युसूफवडगाव (ता. केज) केंद्रांतर्गतच्या काही मुलांना या गोळ्यांचा त्रास झाल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पाटोद्यातील रंधवे वस्तीवरील शाळेतील तीन मुलांना थेट जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
परळी तालुक्यातील मांडखेल आजुबाई विद्यालयातील मुलांना शनिवारी सकाळी मळमळ आणि अंग खाजू लागल्याने मुख्याध्यापक व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून परळीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. सरकारी व खासगी डॉक्टरांनी एकत्रित येऊन सर्व मुलांची तपासणी केली व सायंकाळी सर्व मुलांना घरी पाठवण्यात आले. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी जंतूनाशक गोळ्या दिल्यामुळेच झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र उपचार करणारे बालरोगतज्ज्ञ डॉ. गुरुप्रसाद देशपांडे यांनी सांगितले. जंतनाशक गोळ्यांचा जास्तीत जास्त दहा तासांमध्येच परिणाम समोर येत असतो. मांडखेल शाळेतील मुलांवर गोळीचा कोणाताही परिणाम नसून अफवांच्या भीतीतून मुले घाबरल्याचेच जाणवले. तर जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे यांनी सांगितले, जंतूनाशक गोळ्या दिल्यानंतर सौम्य प्रमाणात मळमळ होणे, उलटी येणे किंवा डोकेदुखी होणे याचा समावेश आहे. मात्र याचा कोणताही विपरित परिणाम होत नाही.