मजुरीकाम मिळत नसल्याने, तसेच माहेरी आलेल्या विवाहित मुलीचे बाळंतपण कसे करावे, या प्रश्नाने हैराण झालेल्या मजुराने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सेनगाव तालुक्यातील वलाना येथे हा प्रकार घडला. बबन विठ्ठल घाटोळकर (वय ४१) असे या मजुराचे नाव आहे.
बबनची विवाहित मुलगी बाळंतपणासाठी माहेरी आली होती. मात्र, बबनच्या हाताला काम न मिळाल्याने तो आधीच अडचणीत होता. मुलीचे बाळंतपण कसे करावे, या विवंचनेत त्याने घरातच गळफास घेत जीवनयात्रा संपविली. गोरेगाव पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. बबन घाटोळकर हाताला काम मिळत नसल्यामुळे पुणे येथे मजुरी कामासाठी गेला होता. त्याची मुलगी बाळंतपणासाठी आठ दिवसांपासून माहेरी आली होती. त्यामुळे घाटोळकर यांनी पुणे सोडून गावचा रस्ता धरला. तीन दिवसांपूर्वी तो वलाना येथे आला होता.
मात्र, हाताला काम मिळत नसल्याने तो चांगलाच अडचणीत सापडला होता. मुलीचे बाळंतपण कसे करावे, असा प्रश्न त्याच्यापुढे होता. रविवारी आई, पत्नी व मुलगी घराबाहेर अंगणात बसले असताना तो घरात गेला व गळफास घेतला. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी शेजाऱ्यांना माहिती दिली. रामदास हेंबाडे यांनी घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांत दिली. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.