सुप्रिया सुळे यांचे आरक्षण धोरण असेही अन् तसेही

सामाजिक आरक्षण हवे की, आर्थिक निकषावर आरक्षण हवे, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे संभ्रमात असल्याचे बुधवारी दिसून आले. जागर जाणिवांचा या महाविद्यालयीन युवक-युवतींबरोबर आयोजित संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर जातविरहीत समाजरचना करण्यासाठी आवश्यक ती पावले का उचलली जात नाहीत, या आशयाचे थेट प्रश्न विचारले. अशी समाजरचना व्हावी, अशी आपली इच्छा आहे. युवकांनी उपस्थित केलेला प्रश्न रास्त आहे असे त्या म्हणाल्या. आर्थिक निकषावर आरक्षण देण्यासही त्यांनी सकारात्मकता दाखवली. औरंगाबाद शहरातील दोन महाविद्यालयात घेण्यात आलेल्या संवाद कार्यक्रमातून आरक्षणाच्या मुद्दय़ावर सोयीची भूमिका घेता येईल, असे वक्तव्य त्यांनी केले. पत्रकार बैठकीत या अनुषंगाने बोलताना त्या म्हणाल्या, हे आरक्षण किंवा ते आरक्षण, असे हे किंवा ते असे करता येत नाही. आर्थिक निकषाबरोबर सामाजिक आरक्षणाचे मिश्रण करता येऊ शकेल काय, याची चाचपणी सरकारने करायला हवी. मात्र, हा प्रश्न गांभीर्याने सोडविण्याचा आहे. धनगर, मराठा आणि मुस्लिम या तीनही समाजाला आरक्षण मिळायला हवे, अशी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

जागर जाणिवांच्या या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सरस्वती भुवन महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. या वेळी कला शाखेच्या पहिल्या वर्षांला शिकणाऱ्या रामेश्वर घुगे म्हणाला, ‘जातीयवादाची चर्चा सुरू आहे. तो जर संपवायचा असेल तर शाळा सोडल्याच्या दाखल्यावरून जातीचा रकाना खोडायला हवा’. कृष्णा शिंदे विद्यार्थी म्हणाला, ‘पाचवीपासून जातीचे प्रमाणपत्र मागितले जाते, हे कमी करता येणार नाही का?’ संतोष तौर या बीडच्या तरुणाने मराठा आरक्षण आणि कोपर्डी घटनेबाबत तुम्ही संसदेत किती प्रश्न विचारले, असाही सवाल केला. या प्रश्नांना उत्तरे देताना सहाजिक चर्चा आर्थिक निकषावर गेली. तेव्हा एखाद्याला शिक्षण परवडत नसेल, गरिबीमुळे उच्चदर्जाचे शिक्षण मिळत नसेल तर त्याला आर्थिक निकषावर आरक्षण मिळायला हवे, या विद्यार्थ्यांच्या मागणीला सुप्रिया सुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचवेळी त्यांनी सामाजिक आरक्षणाचीही गरज असल्याचे सांगितले. धनगर, मराठा आणि मुस्लिम या समाजाला आरक्षण मिळायला हवे, असेही त्या म्हणाल्या. देवगिरी महाविद्यालयात सकाळच्या सत्रात आरक्षण जातीवर हवे की, जातविरहीत समाजरचना हवी, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला आणि जातविरहीत समाजरचना मान्य असणाऱ्या विद्यार्थ्यांनी हात वर करावेत, अशी सूचना केली. आणि महाविद्यालयातील सर्वच तरुणांनी हात उंचावून आम्ही जात सोडण्यास तयार असल्याचे सांगितले. या वेळी बालविवाह, लैंगिक शिक्षण, यावरही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. ‘कॅशलेस’ समाजाऐवजी ‘कास्टलेस’ समाज हवा, अशी मागणी तरुणांनीच केली. मात्र, याच कार्यक्रमात जातीवर आधारित आरक्षण मिळायला हवे, अशाही मागण्या झाल्या. या पाश्र्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी जातविरहीत समाजाला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. पत्रकार बैठकीत ही संकल्पना आदर्श असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र, आरक्षणाच्या मुद्दय़ावर त्या विरोधाभासी वक्तव्य करत होत्या. त्यांची वक्तव्ये विरोधाभासी आहेत, असे लक्षात आणून दिल्यानंतर ‘या किंवा त्या बाजूने आरक्षणाचा विचार करता येणार नाही. सरकारने या अनुषंगाने अभ्यास करण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.