काँग्रेस परभणी जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांनी मुलाच्या विवाहाप्रसंगी केलेल्या लाखो रुपयांच्या उधळपट्टीची दखल आयकर विभागाने घेतली असून, त्यांना उत्पन्नाचे स्रोत विचारले जाण्याची शक्यता आहे. औरंगाबाद येथील आयकर विभागातील अधिकाऱ्यांकडेही याबाबत तक्रार करण्यात आली असून, चौकशीसाठी नाशिक आयकर विभागातील अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या नव्या घडामोडीमुळे देशमुखांच्या अडचणी वाढणार आहेत.
देशमुख यांनी तिरुपती येथे मुलाच्या विवाहात केलेल्या खर्चाचे स्रोत कोणते, याची विचारणा होण्याची शक्यता आहे. आयकर विभागाकडे या वर्षी रिटर्न्स दाखल करताना विवाहातील खर्चाचा हिशेब दिला जातो का, याची तपासणी होईल. त्यांच्याकडील संपत्तीचा हिशेबही येत्या काळात मागितला जाऊ शकतो, असे आयकर विभागातील सूत्रांनी सांगितले. या अनुषंगाने आलेली तक्रार, विवाह सोहळय़ाचे दृश्य आणि प्रसिद्ध झालेले वृत्त याची शहानिशा होणार आहे.
दरम्यान, या सोहळय़ाची चर्चा परभणीमध्येही सुरू झाली आहे. या सोहळय़ादरम्यान एक बॅगही हरवली होती, मात्र विवाह सोहळय़ास उपस्थित असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने ती शोधून दिल्याचेही सांगितले जात आहे. या बॅगेमध्ये काही कागदपत्रे व पारपत्र होते. त्यात मोठी रक्कम असल्याचेही सांगितले जात होते.