शाळेत येणारे प्रत्येक मूल प्रगतच झाले पाहिजे. त्यासाठी मुलांची अध्ययनक्षमता ओळखून अध्यापन करावे, असे प्रतिपादन शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी येथे केले. जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याचे आदेशही त्यांनी या वेळी दिले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी मानवत येथील के. के. एम. महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी कार्यशाळा झाली. या वेळी डॉ. भापकर बोलत होते. मानवत तालुक्यात अहवालानुसार शाळेतील मुलांचे गळतीचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. त्यासाठी उपाययोजना करून हे प्रमाण कसे थांबविता येईल, यासाठी डॉ. भापकर यांनी मानवत तालुका दत्तक घेतला आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत एकूण शंभर दिवसांचा कार्यक्रम मुलांची गळती थांबविण्यासाठी तयार केला आहे. डॉ. भापकर म्हणाले, की मागील काही वर्षांपासून परीक्षा पद्धती बंद असल्याने मुलांचे मूल्यमापनच चांगले होत नाही. परिणामी, त्याचा प्रभाव गुणवत्तेवर होतो. त्यामुळे योग्य मूल्यमापन व्हावे, तसेच मुलांच्या क्षमतेप्रमाणे, मानसिकतेप्रमाणे शिक्षण दिले जावे. मुलांचे गळतीचे प्रमाण थांबविण्यासाठी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन मुले स्थलांतरित होणार नाहीत याची काळजी घ्यावी. पालकांनी स्थलांतर केले तरी शिक्षण हमीकार्डच्या माध्यमातून मुलांचे स्थलांतर थांबविता येते. येत्या आठ दिवसांत सहा ते चौदा वर्षे वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याचे आदेशही डॉ. भापकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. शिक्षकांनी आपला जास्तीतजास्त वेळ विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी खर्च केला जावा, तसेच काम करताना स्वत:शी व इतरांशी प्रामाणिक राहावे. विद्यार्थ्यांला केवळ शिक्षणातच गुणवान करायचे नाहीतर त्याला सर्वागीण दृष्टीने प्रगत करावे, असे आवाहन केले. कार्यशाळेत आमदार बाबाजानी दुर्राणी, जि.प.चे शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे, उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, अनिल नखाते, शिक्षण उपसंचालक सुधाकर बनाटे, तहसीलदार बनगर, शिक्षणाधिकारी आशा गरुड, बी. आर. कुंडगीर, आठवले, डॉ. सूर्यकांत कुलकर्णी यांच्यासह सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, प्राचार्य, मुख्याध्यापक उपस्थित होते.