मराठवाडय़ातील ५४ लाख ८५ हजार २७४ लोकसंख्या टँकरवर अवलंबून आहे. सध्या तब्बल ३ हजार १७४ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून जलसाठा जसजसा कमी होईल तसतसे टँकर वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी औरंगाबाद शहराचे तापमान ४१.२ अंश सेल्सियसवर गेले. अन्य शहरांतील तापमानाने कधीची चाळिशी ओलांडली. तापमान वाढत असल्याने जलसाठे आटू लागले आहेत. परिणामी टँकर वाढत आहेत. सर्वाधिक ८३८ टँकर बीड जिल्ह्य़ात आहेत. पाऊस पडेपर्यंत मराठवाडय़ास टँकरचा विळखा असणार आहे.
मराठवाडय़ातील आठ जिल्ह्य़ांत ८ हजार ५३६ गावे आहेत. पैकी ३ हजार ४० गावे-वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठय़ाच्या रखडलेल्या योजनांना या वर्षी पुरेसा निधी मिळाला नाही. विशेषत: राजीव गांधी पेयजल योजना व भारत निर्माणच्या रखडलेल्या योजनांना निधी न मिळाल्याने प्रशासनाचीही अडचण झाली. जलसाठे आटत गेल्याने शहरी भागात निर्माण झालेली पाणीटंचाई चर्चेत असली, तरी ग्रामीण भागात पाणी आणण्यासाठी सर्वसामान्यांना लांबच लांब पायपीट करावी लागते. या पाश्र्वभूमीवर टँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
तुलनेने चांगला पाऊस पडूनही औरंगाबाद जिल्ह्य़ात टँकरची संख्या लक्षणीय आहे. तब्बल ७१२ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. सर्वात मोठे धरण (जायकवाडी) असलेल्या पैठण तालुक्यात १६४ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वात कमी ३० टँकर हिंगोली जिल्ह्य़ात आहेत. टँकर भरण्यासाठी विहीर अधिग्रहणाचे प्रमाणही वाढले आहे. ६ हजार ८५६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.