सणासुदीच्या काळात राज्यभर सध्या भारनियमन सुरु आहे. मात्र, औरंगाबादमध्ये पक्षपातीपणे भारनियमन केले जात असल्याचा आरोप करीत एमआयएम पक्षाकडून आज महावितरणच्या कार्यालाची तोडफोड करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील भारनियमनविरोधात रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर महावितरण कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असताना अधिकारी जागेवर हजर नसल्याने संतप्त झालेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाची तोडफोड केली. शहर अभियंता यांच्या कार्यालयातील काचा फोडल्या तसेच एसी देखील तोडण्यात आला. यावेळी झालेल्या झटापटीत एका सुरक्षारक्षक महिलेला किरकोळ दुखापत झाली.

औरंगाबाद शहरात काही भागात तीन तास तर काही भागात नऊ तास वीज गायब असते. शहरातील मुस्लिमबहुल भागातच जास्त काळ वीज जात असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. सर्वत्र दोन तास समप्रमाणात वीज कपात करण्यात येत असेल तर आमची काही अडचण नाही. वीज नसल्याने रात्री-अपरात्री पाणी भरण्यासाठी महिलांना उठावे लागत आहे. रात्रीची वीज कपात थांबवावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. महावितरणला आंदोलन करणार असल्याची पूर्व कल्पना देण्यात आली होती. तरीसुद्धा एकही जबाबदार अधिकारी कार्यालयात हजर नव्हता, आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलो होतो. मात्र, अधिकारी हजर नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांकडून तोडफोड झाली. या तोडफोडीला हे अधिकारीच पूर्णपणे जबाबदार असल्याचे जलील म्हणाले.

एमआयएमकडून आंदोलन होणार असल्याची पूर्वकल्पना दिलेली असतानाही अधिकारी गैरहजर असतील तर संबंधितांवर कारवाई करणार. मात्र, अशा पद्धतीने जी तोडफोड झाली त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. त्यामुळे तोडफोड करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The break up of the msedcl office in aurangabad by mim
First published on: 06-10-2017 at 18:41 IST