जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील कस्तुरवाडीत नदीत बुडून तीन मुलींचा मृत्यू झाला. या मुली कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या.
सायमा जुम्मेखा पठाण (वय १४), गजाला मोईन शेख (२०) आणि सूरय्या मोईन शेख (१८) अशी मृत मुलींची नावे आहेत. दुपारी बाराच्या दरम्यान कस्तुरवाडी येथील लहुकीनदीवर चार मैत्रिणी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा हा प्रकार घडला.

पावसामुळे नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. दरम्यान, एका मुलीचा तोल गेला आणि ती पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी गेलेल्या दोघींनाही पाण्याचा अंदाज न आल्याने त्याही पाण्यात पडल्या. चौथी मुलगीही त्यांना वाचवण्यासाठी गेली होती मात्र तिचा हात निसटल्याने तिचा जीव वाचला. एकाच गावातील तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

कस्तुरवाडीतील नदीचे मागील वर्षी नदी खोलीकरण योजनेतून खोलीकरण करण्यात आले होते. माघील पंधरवड्यात नदीला पाणी नव्हते. मात्र, गेल्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. आज रविवारची सुटी असल्याने या मुली कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या. शांतपणे प्रवाहित असलेल्या या नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही घटना घडली. याबाबत गावकऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्यांना बदनापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.