औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन येथे गणेश विसर्जनादरम्यान एक दुर्देवी घटना घडल्याचे वृत्त आहे. शिवनाई तलावात गणपती विसर्जन करताना तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आदिल किर्तीशाई (वय १२), सागर तेलभाते (वय १३), राजेश गायकवाड (वय १२) अशी या बुडालेल्या तीन चिमुकल्यांची नावे आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या अर्जुन पोपळघट आणि योगेश कांबळे यांना वाचवण्यात यश आले आहे.

शिवनाई तलावात अधिकृतरित्या गणेश विसर्जन केले जात नाही. त्यामुळे तलावाशेजारी कसल्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला नसल्याचे सुत्रांकडून कळते. गावातील गणेश मुर्तींचे नेहमी ज्या ठिकाणी विसर्जन केले जाते तेथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अधिकृतरित्या गणेश विसर्जनासाठी या तलावात परवानगी नसली तरी, घरगुती गणेशाचे विसर्जन येथे केले जाते. त्यामुळे हे पाच चिमुकले गणेशाचे विसर्जन करण्यासाठी तलावाकडे गेले होते.

या तलावात अवैधरित्या उत्खनन झालेले असल्याने मोठ-मोठे खड्डे झाले आहेत. कदाचित त्याचा अंदाज न आल्याने या मुलांना पाण्याचा खोलीचा अंदाज आला नसावा. घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी जे नागरिक आले होते, त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली. त्यांनी या तलावाकडे धाव घेतली आणि त्यांना तत्काळ पाण्याबाहेर काढले. तसेच उपचारासाठी बिडकीन शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यातील तिघांना रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले. अर्जुन पोपळघट आणि योगेश कांबळे यांना प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे.

गणेश विसर्जनादरम्यान ही घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.