११ ते १४ नोव्हेंबर दरम्यान जमा झालेल्या बाद नोटांचा विषय अनिर्णीत

चलनातून बाद झालेल्या एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास जिल्हा सहकारी बँकांना केवळ तीन दिवस अनुमती मिळाली होती. या तीन दिवसांतल्या जेमतेम २४ तासांच्या कामकाजात राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्हा बँकांमध्ये सुमारे तीन हजार कोटी रुपये जमा झाले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या प्रतिबंधामुळे ही प्रचंड रक्कम त्या-त्या बँकांमध्ये १५ दिवसांपासून पडून आहे.

९ नोव्हेंबरपासून चलनातून अवैध ठरलेल्या नोटांच्या बाबतीत पुढील कार्यवाही करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने सरकारी, खाजगी तसेच नागरी सहकारी बँकांसाठी परिपत्रक जारी केले होते. त्यात जिल्हा सहकारी बँकांचा उल्लेख नव्हता. त्यामुळे १० नोव्हेंबर रोजी जिल्हा बँकांना आपल्या ग्राहक-ठेवीदारांकडील एक हजार व पाचशेच्या नोटा जमा करून घेता आल्या नाहीत; पण त्यानंतर जिल्हा बँकांच्या विनंतीनुसार ११ नोव्हेंबरपासून या बँकांना बाद नोटा स्वीकारण्याची तसेच घालून दिलेल्या मर्यादेत बदलून देण्याची परवानगी देण्यात आली.

त्यानंतरच्या तीन दिवसांत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ६८ शाखांच्या माध्यमातून १४ कोटी रुपये जमा झाले. पण या काळात राज्यातील पुणे, नाशिक, कोल्हापूर आदी जिल्हा सहकारी बँकांमध्ये विक्रमी रक्कम जमा झाली. काही बँकांमध्ये जुन्या नोटांच्या माध्यमातून जमा झालेल्या रकमेचे आकडे आता समोर आले आहेत. पुणे जिल्हा बँकेत सुमारे ६०० कोटी, नाशिक ४०० कोटी, कोल्हापूर ३०० कोटी, लातूर २०० कोटी, परभणी १०० कोटी, सोलापूर ३०० कोटी याप्रमाणे प्रचंड प्रमाणावर रक्कम पहिल्या तीन दिवसांतच जमा झाल्याचे समजल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेने १५ नोव्हेंबरपासून जिल्हा बँकांमधील हा व्यवहार तडकाफडकी थांबविल्याने संबंधितांत खळबळ उडाली. त्यानंतरच्या १५ दिवसांपासून जिल्हा बँकांच्या ‘स्ट्रॉंग रुम’मध्ये एक हजार व पाचशेच्या जुन्या नोटा तशाच पडून आहेत. खातेदार आणि ठेवीदारांच्या खात्यांवर ११ ते १४ नोव्हेंबर दरम्यान रक्कम तर जमा झाली; पण त्यात नवा तिढा निर्माण झाल्याने या कालावधीत जमा झालेली रक्कम खातेदारांना काढता येत नसल्याचे सांगण्यात आले. विवाह सोहळ्यांमध्ये विघ्न येऊ नये, यासाठी ज्या बँक ग्राहकांच्या घरी विवाह निश्चित झाला आहे, अशा ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यातून अडीच लाख रुपये काढण्यास रिझव्‍‌र्ह बँकेने सशर्त परवानगी दिली. पण या संबंधीच्या आदेशातून जिल्हा सहकारी बँकांना वगळल्यामुळे अनेक ग्राहकांची गरसोय झाली. नांदेडसह अनेक जिल्हा बँका त्रस्त आहेत, चलन तुटवडय़ामुळे. जिल्हा बँकांमध्ये ११ ते १४ नोव्हेंबर दरम्यान जमा झालेल्या नोटा अधिसूचित सरकारी बँकेत स्वीकारण्यात आलेल्या नाहीत.

जिल्हा सहकारी बँकांकडे ११ ते १४ नोव्हेंबर दरम्यान मोठय़ा प्रमाणावर काळा पसा जमा झाला असावा, असा केंद्र सरकार व रिझव्‍‌र्ह बँकेचा संशय असून अशा रकमेतून कर्ज खाती निरंक करण्यात आली काय, याचा शोध घेण्यात येणार आहे. पण रिझव्‍‌र्ह बँकेच्या कडक धोरणामुळे सुपात असलेले बँक ग्राहक जात्यात अडकले आहेत.