जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनअंतर्गत केंद्रपुरस्कृत स्वच्छ भारत मिशनच्या शौचालय बांधकामात उस्मानाबाद जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. प्रत्येक वर्षी सरकारने दिलेल्या उद्दिष्टांपकी निम्मेही उद्दिष्ट गाठण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनाने आता मात्र सकारात्मक भूमिका घेत घरोघरी शौचालय बांधकामासाठी तृतीय पंथीयांमार्फत जनजागृती सुरू केली आहे. याची परिणती म्हणून येत्या डिसेंबरअखेपर्यंत लोहारा तालुका १०० टक्के हागणदारीमुक्त होणार असल्याचा दावा स्वच्छता विभागाने केला. जिल्ह्यातील ६२३ पकी केवळ ८५ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम पुरस्कार मिळाला आहे. असे असले, तरी आता या गावांमध्ये वेगळेच चित्र पाहावयास मिळत आहे.
जिल्ह्यात हागणदारीमुक्त गाव व शौचालय बांधकामांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा व तालुका स्तरावरून एकूण २३ ग्रामपंचायतींना विशेष संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले. शौचालय बांधकाम-वापर, नियमित हात धुणे, पिण्याच्या पाण्याची साठवण-हाताळणी, लहान मुलांच्या मैल्याची विल्हेवाट ही चार प्रमुख उद्दिष्टे यात आहेत. वैयक्तिक शौचालय बांधकाम-वापर, घनकचरा-सांडपाणी व्यवस्थापन व सार्वजनिक स्वच्छतागृह आदी कामे केली जात आहेत. २०१२ च्या सव्र्हेक्षणानुसार जिल्ह्यात ६२२ ग्रामपंचायतींमध्ये दोन लाख ७९ हजार ६२ कुटुंबसंख्या आहे. पकी ८४ हजार ९६१ कुटुंबांकडे शौचालये आहेत. उर्वरित १ लाख ९४ हजार १०१ कुटुंबांना २०१९ पर्यंत शौचालय उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे. मिशनअंतर्गत १०० टक्के गाव हागणदारीमुक्त झाले असल्यास त्या गावांना हागणदारीमुक्त गाव म्हणून गौरविण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील शौचालय बांधकाम व वापराचे प्रमाण वाढत असून अधिकाधिक गावे हागणदारीमुक्त होत आहेत.
लोहारा तालुका १०० टक्के हागणदारीमुक्त करण्यासाठी तृतीय पंथियांमार्फत ४५ ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी दोन फेऱ्या घेण्यात आल्या. यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात शौचालय बांधकामाच्या कामास गती आली. डिसेंबरअखेर लोहारा तालुका १०० टक्के हागणदारीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. या दृष्टीने जिल्हा व तालुका स्तरावरून २३ ग्रामपंचायतींना विशेष संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
वैयक्तिक शौचालयास प्रोत्साहनपर निधी
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत दारिद्रय़रेषेखालील सर्व कुटुंबे, दारिद्रय़रेषेवरील अल्प-अत्यल्प भूधारक कुटुंब, भूमिहिन शेतमजूर कुटुंब, महिला कुटुंबप्रमुख, शारीरिकदृष्टय़ा अपंग कुटुंबप्रमुख, अनुसूचित जाती-जमाती या संवर्गातील कुटुंबांनी वैयक्तिक शौचालय बांधून नियमित वापर सुरू केल्यानंतर १२ हजार रुपये प्रोत्साहनपर निधी देण्यात येतो.
उद्दिष्टपूर्तीला वेग हवा
चालू वर्षांत ५५ हजार ४४५ वैयक्तिक शौचालय बांधकामांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. पकी ऑक्टोबरअखेर १२ हजार ९५२ उद्दिष्ट साध्य झाले, तरीही उस्मानाबाद जिल्ह्य़ाने राज्यात तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली. आजपर्यंत एकूण १२ हजार ३८६ वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. १२ हजारप्रमाणे ८ हजार ६४९ कुटुंबांना १० कोटी ३७ लाख ८८ हजार व ४ हजार ६०० प्रमाणे ४३५ कुटुंबांना २० लाख १ हजार असा एकूण १० कोटी ५७ लाख ८९ हजार रुपये प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यात आला. असे असले, तरी ग्रामीण भागातून आलेले वैयक्तिक शौचालयासाठीच्या निधी मागणीचे शेकडो प्रस्ताव प्रलंबित आहेत.