बियाणे विक्री करून गडगंज नफा कमावणाऱ्या व्यापाऱ्यांकडून महाबीजने शिल्लक राहिलेले बियाणे परत घेत दिलासा दिला, परंतु बीज उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यातील १ हजार ४०० शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडून दिले! परिणामी १२० टन बियाणे सध्या दुष्काळामुळे धूळखात पडून आहे. महाबीजच्या या आडमुठेपणामुळे बीजउत्पादक शेतकरी मोठय़ा आíथक कोंडीत सापडले आहेत.
जिल्ह्य़ात सलग चौथ्या वर्षी दुष्काळाने मुक्काम ठोकला आहे. परिणामी खरिपाचा पेरा अत्यल्प झाला. व्यापाऱ्यांच्या गोदामात बियाण्यांच्या पिशव्या तशाच पडून होत्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही व्यापाऱ्यांकडून शिल्लक बियाण्यांच्या पिशव्या महाबीजने विनाअट परत घेतल्या आहेत. शिल्लक बियाणे परत घेऊन महाबीजने व्यापाऱ्यांना मोठा आíथक दिलासा दिला. मात्र, जिल्ह्यातील चार हजार एकर क्षेत्रावर मागील अनेक वर्षांपासून बीजनिर्मिती करून महाबीजला मोठय़ा प्रमाणात लाभ मिळवून देणारे शेतकरी यंदा आíथक कोंडीत सापडले. दुष्काळामुळे बीजउत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी खरिपात लागवड केली नाही. पाण्याची कमतरता आणि दुष्काळाचा वाढलेला मुक्काम यंदा बीज उत्पादकांच्या मुळावर उठला आहे.
जिल्ह्यातील चार हजार एकर क्षेत्रावर १ हजार ४०० बीजउत्पादक दरवर्षी नवीन बियाणे तयार करण्यासाठी लागवड करतात. मागील २५ ते ३० वर्षांपासून अनेकजण सातत्याने बीज उत्पादनाची शेती करीत आहेत. त्यातून निर्माण झालेले बियाणे महाबीजला विकले जाते व या बियाण्यांची विक्री व्यापाऱ्यांमार्फत महाबीज हे शासकीय बियाणे महामंडळ शेतकऱ्यांना करते. मागील अनेक वर्षांपासून सुरळीत सुरू असलेल्या या चक्राला दुष्काळाने मात्र खोडा घातला. त्यामुळे बीज उत्पादक शेतकऱ्यांनी विकत घेतलेले सुमारे एक कोटी रुपयांचे बियाणे सध्या धूळखात पडून आहे.
व्यापाऱ्यांकडून शिल्लक राहिलेल्या पिशव्या परत घेणाऱ्या महाबीजने शेतकऱ्यांकडून बियाणे परत घेण्यास असमर्थता दर्शविली. दरवर्षी शिल्लक राहिलेले बियाणे व्यापारी महामंडळाला परत करतात. मात्र, मागील २५ वर्षांत एकदाही बीजउत्पादक शेतकऱ्यांनी बियाणे परत घ्या, अशी मागणी केली नाही. दुष्काळामुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीला महाबीज केराची टोपली दाखवत आहेत. धूळखात पडून असलेले बियाणे खुल्या बाजारात विकावे म्हटले तर सध्या दर कोसळले आहेत. महाबीजकडून ७२ रुपये किलोने विकत घेतलेल्या बियाण्यांची सध्या बाजारातील किंमत ३५ रुपये किलो आहे.
आज आंदोलनाचा इशारा
मागील २५ वर्षांपासून बीज उत्पादन करीत आहोत. एकदाही बियाणे परत घ्या, अशी मागणी केली नाही. व्यापाऱ्यांकडून शिल्लक बियाणे परत घेतले जात असतील, तर शेतकऱ्यांकडून का घेऊ नये? दुष्काळ व पाणीटंचाईमुळे अडचणी वाढल्या आहेत. आजवर आम्ही निर्माण केलेल्या बियाण्यांच्या विक्रीतून महाबीजला नफा मिळत आला. सलग चौथ्या वर्षी दुष्काळाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अशा वाईट काळात महाबीजने आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून दिलासा द्यायला हवा. मात्र, शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचे हित जोपासण्यात महामंडळ धन्यता मानत आहे. त्यामुळे उद्या (मंगळवारी) शहरातील महाबीज कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे बीज उत्पादक शेतकरी शिवाजी नाईकवाडी यांनी सांगितले.
प्रस्ताव विचाराधीन
बाजारात खासगी कंपन्यांबरोबर मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे महाबीजला व्यापाऱ्यांचे हित ध्यानात ठेवून महामंडळाच्या फायद्यासाठी वेळोवेळी धोरण आखावे लागते. त्यानुसार व्यापाऱ्यांकडून शिल्लक बियाण्यांच्या पिशव्या राज्यात सर्वत्र परत घेतल्या जातात. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर बीजउत्पादक शेतकऱ्यांनी केलेली मागणी रास्त आहे. तसा प्रस्ताव महामंडळाच्या विचाराधीन आहे. लवकरच या अनुषंगाने सकारात्मक निर्णय होणार असल्याचे महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मण कंकाळ यांनी सांगितले.