शिवसेनेचे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा करणाऱ्या अपक्ष आमदार रवी राणा यांचा परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी समाचार घेतला. ज्यांचा स्वत:चा पक्ष नाही, ते दुसऱ्या पक्षाबद्दल बोलतात कशाला? असा टोला त्यांनी राणांना लगावला. औरंगाबादमध्ये परिवहन विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्य सरकारचे कामकाज उत्तमरीत्या सुरु आहे. अपक्ष आमदार सरकारबरोबर राहतील. तसेच शिवसेनेचे २० ते २२ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा राणा यांनी केला होता. त्यावर रावतेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोण रवी राणा? त्यांना स्वतःचा पक्ष नाही. ते इतर पक्षाबद्दल बोलतात कशाला, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. दसऱ्यानंतरही तुम्ही असेच निर्णय घ्याल का, असा प्रश्न विचारला असता, पदावर असेपर्यंत जनतेच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेनंतर शिवसेना सत्तेबाहेर पडेल, अशा चर्चा सध्या सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र पदावर आहे तोपर्यंत जनतेसाठी काम करेन, असे सांगत त्यांनी भाजप-शिवसेना यांच्यातील वादावर अधिक बोलणे टाळले.

यावेळी राज्यभरातील रिक्षांना सरसकट परवाने देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे राज्यभरातील चार ते पाच लाख रिक्षा चालकांना फायदा होईल, असे ते म्हणाले. या निर्णयाबद्दल रावते म्हणाले की, ‘केंद्र सरकारच्या मोटार नियम कायद्यानुसार राज्य सरकारचे कामकाज सुरू आहे. १९९७ मध्ये रिक्षांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने नवीन रिक्षांना परवाने न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आजपर्यंत निर्णयात बदल करण्यात आला नव्हता. मराठवाडा आणि विदर्भात खासगी रिक्षांची संख्या मोठी आहे. त्यांना रोजगार मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यांसदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून अधिकारी आणि कायदेतज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.