तुळजाभवानी दानपेटी गैरव्यवहार

तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन पेटीच्या गैरव्यवहारात अडकलेल्या ठेकेदाराला आघाडी सरकारच्या काळात दानपेटी लिलावातील १ कोटी २१ लाख ५८ हजार ८५४ रुपये अनामत रक्कम परत केल्याप्रकरणी दाखल याचिकेत प्रशासनालाही प्रतिवादी करावे. तसेच मंदिरातील गैरव्यवहाराच्या अनुषंगाने सीआयडी चौकशीच्या अहवालावर पुढे काय कारवाई झाली, याची माहिती न्यायालयात सादर करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले.

तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन दानपेटीत पडणारे सोन्या-चांदीचे दागिने तसेच मौल्यवान वस्तू ठेकेदार गायब करत असल्याचे दिसून आले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी या अनुषंगाने कारवाई केली होती. मंदिरातील कारभार पारदर्शी असावा, या साठी पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी मंदिरातील दानपेटीत मौल्यवान वस्तू पडू दिल्या जात नाहीत अथवा काढून घेतल्या जातात, असे १० वर्षांतील आकडेवारींचा अभ्यास करून प्रशासनाला कळविले होते. ज्या ठेकेदारांचा यात सहभाग होता त्यांची सीआयडीमार्फत चौकशी करावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशी पूर्णही झाली.