३९ किलो सोने आणि ६०८ किलो चांदीची लूट ; आमदार मधुकर चव्हाण यांच्यासह ११ सनदी अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या चरणी श्रद्धेने मौल्यवान वस्तू आणि रोकड अर्पण करणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेचा मंदिर संस्थानने अपहार केला आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे जगदंबेच्या दानपेटीवर डल्ला मारत ३९ किलो सोने आणि ६०८ किलो चांदीची लूट करणाऱ्या ४२ जणांविरुद्ध फौजदारी दाखल करण्याची शिफारस ‘सीआयडी’ने आपल्या अहवालात केली आहे. यात ९ उपविभागीय अधिकारी, ९ तहसीलदार, १० ठेकेदार, मंदिराचा कारभार पाहणारे १४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. भ्रष्टाचाराला जबाबदार असलेले विश्वस्त तथा विद्यमान आमदार मधुकर चव्हाण आणि ११ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांवर राज्य सरकारनेच योग्य ती कारवाई करावी, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन दानपेटीत १९९१ ते २०१० या २० वर्षांत मंदिर संस्थान आणि ठेकेदारांनी संगनमताने घातलेला सावळा गोंधळ चव्हाटय़ावर आला आहे. या कालावधीतील तुळजाभवानीच्या दानपेटीत झालेल्या गरव्यवहाराची चौकशी ‘सीआयडी’मार्फत सुरू होती. ‘सीआयडी’च्या पुणे मुख्यालयातून हा चौकशी अहवाल ‘लोकसत्ता’च्या हाती लागला आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थानचा कारभार अद्यापही निजाम सरकारने घालून दिलेल्या देऊळ-ए-कवायत यानुसार चालतो. त्यात अद्याप बदल करण्यात आलेला नाही. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी मंदिर संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. तर तुळजापूरचे आमदार, नगराध्यक्ष, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार सदस्य आहेत.

मंदिरातील शेकडो कोटी रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ४२ अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांवर भाविकांची फसवणूक करून घोटाळा केला असल्याचा आरोप सीआयडीने ठेवला आहे. त्यानुसार सीआयडीने संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. त्यात ११ जिल्हाधिकारी आणि ८ नगराध्यक्षांवरही ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच चौकशी अहवालातही त्यांनी बदल केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे

सीआयडीने एम. जी. मांडुरके, वायचळ, जोगदंड, डॉ. सतीश भिडे, पाठक, वामनराव कदम, एस. पी. सावरगावकर, विकास नाईक आणि सुनील यादव या ९ उपविभागीय अधिकाऱ्यांवर तर बी. दा. व्यवहारे, डी. एस. कोळेकर, जी. टी. जाधव, बी. एल. कोरलकर, ए. बी. गव्हाणे, बी. जी. पवार, सतीश राऊत, देवेंद्र कटके या ९ तहसीलदारांवर फौजदारी दाखल करण्याची शिफारस केली आहे. यातील काही आरोपींचा मृत्यू झाला आहे.

लूट करणारे ठेकेदार

चंदर सोंजी, बाळकृष्ण कदम, धन्यकुमार क्षीरसागर, संभाजी कदम, अरुण सोंजी, संजय कदम, दगडोबा िशदे, अजित कदम, आनंद क्षीरसागर, बापू सोंजी या १० ठेकेदारांनी मागील २० वर्षांत मंदिरातील कोटय़वधी रुपयांच्या मौल्यवान दागदागिन्यांची लूट केली असल्यामुळे त्यांच्यावर दखलपात्र फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असे या अहवालात म्हटले आहे. याचबरोबर ठेकेदारांशी संगनमत करून गरव्यवहार करणारे मंदिरातील कर्मचारी एन. एस. कोळेकर, दिलीप नाईकवाडी, अमृतराव, पेंदे, ढवळे, मरतड बंडगर, वैजीनाथ सोनवणे, बाळकृष्ण कावरे, अनिल चव्हाण, युवराज साठे, राजकुमार भोसले, दिनकर प्रयाग, देवीदास पवार आणि डी. बी. कदम या सगळय़ांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

आमदार चव्हाण व ११ जिल्हाधिकाऱ्यांवर ठपका

मंदिर संस्थानचे विश्वस्त असणारे आमदार मधुकर चव्हाण यांच्याबरोबर मागील २० वर्षांत अध्यक्ष म्हणून मंदिर संस्थानचा कारभार पाहणाऱ्या ११ जिल्हाधिकारी आणि ८ नगराध्यक्षांवर या गरव्यवहारप्रकरणी सीआयडीने ठपका ठेवला आहे. जगदंबेच्या मंदिरातील गरव्यवहारात अनिल पवार, संजयकुमार, राजेशकुमार, मधुकर कोकाटे, सुरेंद्रकुमार बागडे, संजय अग्रवाल, एस. चोक्किलगम, आशिष शर्मा, एम. बी. देवणीकर ही आयएएस मंडळी समाविष्ट आहेत. याच मंडळींच्या दबावामुळे चौकशी अहवाल तीन वेळा बदलण्यात आला आहे.

शेकडो कोटींवर डल्ला?

‘सीआयडी’ला मंदिर संस्थानने अजिबात सहकार्य केले नाही. अधिकाऱ्यांनी माहिती दडवून ठेवली. त्यामुळे सीआयडीला २०१० पासून उतरत्या क्रमाने दरवर्षी १५ टक्के घट गृहीत धरून दानपेटीतील सोने, चांदी, रोकड याचा अंदाज बांधावा लागला आहे. त्यानुसार मागील २० वर्षांत ३९ किलो सोने, ६०८ किलो चांदीची मंदिरातून लूट झाली आहे. त्या त्या काळातील सोन्या-चांदीचे दर गृहीत धरल्यामुळे सीआयडीच्या अहवालात केवळ ७ कोटी १९ लाख रुपयांचाच अपहार नोंदविण्यात आला आहे. प्रत्यक्षात मंदिरातून २०० किलोहून अधिक सोने गायब झाल्याचा अंदाज आहे.

मंदिराचे नुकसान 

तुळजाभवानी मंदिरात प्रारंभी तीन दानपेटय़ा होत्या. हळूहळू त्याची संख्या सातवर गेली. िरगण करून त्याच त्या १२ लोकांनी हे लिलाव पदरात पाडून घेतले. दररोज धार्मिक कार्यालयात दानपेटय़ा उघडण्याची अट असताना मागील २० वर्षांत एकदाही ती अट पाळली गेली नाही. बोगस पंचनामे करून सोने आणि चांदीची लूट करण्यात आली. पुजारी मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष किशोर गंगणे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर गेडाम यांनी या गरव्यवहारात गांभीर्याने लक्ष घातले. ठेकेदारांना हटवून दानपेटय़ांमधील उत्पन्न मोजले. त्या दिवशी ९९ हजार ५६४ रुपये म्हणजे वर्षांला सरासरी ३ कोटी ६३ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न निघाले. त्या वर्षी दानपेटीचा लिलाव २ कोटी ६७ लाख रुपयांना झाला होता. एका वर्षांत मंदिराचे ९६ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे उघडकीस आले.