ऊसतोडणी वाहतूक करणाऱ्या ट्रकवर चालक म्हणून गेलेल्या तिघांना झोपलेल्या ठिकाणीच ट्रक पाठीमागे घेताना चिरडण्यात आल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. मृत, जखमी व चालक हे सर्व शिरूर तालुक्यातील पांगरी येथील असल्याने गावावर शोककळा पसरली आहे. ही घटना पाटस सहकारी साखर कारखाना परिसरात घडली.
शिरूर कासार तालुक्यातील पांगरी येथील बहुतांश लोक ऊसतोडणीसाठी साखर कारखान्यावर जातात. या गावातील चार तरुणही ऊस वाहतूक करणाऱ्या गाडय़ांवर चालक म्हणून गेले होते. दौंड तालुक्यातील पाटस सहकारी साखर कारखाना परिसरात रात्रीच्या वेळी तिघे जण झोपलेले असताना त्यांच्यातील सहकारी लक्ष्मण िशदे हा एमएच ४२-८४२२ ट्रक घेऊन आल्यानंतर त्याने पाठीमागे वळवून ट्रक लावला. त्यावेळी त्या ठिकाणी झोपलेले बापू भास्कर वारे (वय २१), सतीश हनुमान दहिफळे (वय २०) व नामदेव िशदे (वय २२) हे तिघे चाकाखाली चिरडले गेले. तत्काळ तिघांना बाहेर काढण्यात आले. मात्र बापू वारे व सतीश दहिफळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून नामदेव िशदे हा गंभीर जखमी असून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. चौघेही एकाच गावातील मित्र होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले असून या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. नवरात्र महोत्सवानिमित्त हे चौघेही शुक्रवारी गावाकडे येणार होते, तत्पूर्वीच ही घटना घडली.