उद्धव ठाकरे यांचा बीडमध्ये सवाल
सरकारच्या कामावर जनता समाधानी नसेल तर आम्ही कसे असणार? पोकळ गप्पा करून लोकांची तहान भागणार नाही. दुष्काळातून धडा घेऊन दीर्घकालीन उपाय करणे आवश्यक आहे, अशा शब्दांत सरकारच्या कारभारावर नेमकेपणाने बोट ठेवत दुष्काळात शिवसेनाच आपल्या पद्धतीने मदत करण्यास पुढे आली असून, शेतकऱ्यांना थेट मदत व जलसिंचनाची दीर्घकालीन कामे करीत आहे. जिल्ह्यातून एकही आमदार निवडून दिला नसला, तरी दुष्काळात राजकीय विचार न करता माणुसकीने एकमेकांना मदत करून संकटातून बाहेर पडू, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी येथे दुष्काळग्रस्त गरजूंना प्लास्टिकच्या ५० टाक्यांचे वाटप करण्यात आले. पर्यावरणमंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री दीपक सावंत, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार नीलम गोऱ्हे, अर्जुन खोतकर, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे या वेळी उपस्थित होते.
मी भाषणासाठी नव्हे, तर शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलो आहे, असे सांगून ठाकरे म्हणाले, की मराठवाडय़ात भीषण दुष्काळी स्थिती आहे. सत्तेत सहभागी असल्याने आम्हाला विचारणा होते, सरकारच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? जनता समाधानी नसेल तर आम्ही कसे असणार? असा थेट प्रश्न करून केवळ दुष्काळी स्थितीत गप्पा मारून लोकांची तहान भागणार नाही, तर धडा घेऊन जलसिंचनाचे दीर्घकालीन उपाय योजणे आवश्यक आहे.
यंदा भरपूर पाऊस पडावा, अशी अपेक्षा व्यक्त करताना शिवसेनेच्या वतीने सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलेली थेट मदत, शिवजलक्रांती व सामुदायिक विवाह सोहळय़ाबाबत माहिती देत शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता धर्याने तोंड द्यावे, शिवसेना तुमच्यासोबत असल्याचा विश्वास त्यांनी दिला.
‘संपूर्ण कर्जमुक्तीस पाठपुरावा करू’
सरकारने अजून दुष्काळ जाहीर का केला नाही? या उच्च न्यायालयाने उपस्थित केलेल्या प्रश्नावर विचारले असता उद्धव ठाकरे यांनी दुष्काळी भागात तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. न्यायालयाने मुद्दा उपस्थित केल्याने सरकारकडे याबाबत पाठपुरावा करू, असे म्हटले. कर्जाचे पुनर्गठण ही तात्पुरती मलमपट्टी आहे. अनेक शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली आहे. त्यामुळे शिवसेनाही कर्जमाफीसाठी सरकारकडे पाठपुरावा करेल, असे सांगून केंद्र सरकारच्या नदीजोड धोरणावरही थेट प्रतिक्रिया न देता व्यावहारिकता आणि तांत्रिकता तपासून निर्णय घेतला पाहिजे, अशी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली.