उद्धव ठाकरे यांचा दावा; भाजपवर टीका, अभ्यासगट नेमण्याची सूचना

शिवसेनेचे दडपण नसते तर कर्जमाफी ही ‘फॅशन’ आहे, असे मानणाऱ्यांनी कर्जमुक्ती दिली असती काय, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्री ज्या प्रमाणे कर्जमाफीनंतर खरोखर ४० लाख शेतकऱ्यांना लाभ होईल असे सांगत आहेत तो खरोखर होतो की काय, हे शिवसेना तपासेल. कर्जमाफीच्या निर्णयानंतरही नाराज घटकांना अधिक लाभ मिळवून देण्यासाठी तसेच त्याच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी शिवसेना व भाजप मंत्र्यांचा अभ्यासगट नेमण्याची सूचना केली. औरंगाबाद येथे ते पत्रकार बैठकीमध्ये बोलत होते. कर्जमाफीचा निर्णय केवळ शिवसेनेच्या दडपणामुळेच सरकारने घेतल्याचे सांगत त्यांनी भाजप नेत्यांवर तिरकस बाण चालविले.

‘मोबाइलचे बिल भरण्यासाठी पैसे असतात आणि विजेचे देयक भरता येत नाही,’, ‘कितीही दिले तरी रडतात साले’, या भाजप नेते  एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विधानांचा उल्लेख करीत उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी ही फॅशन मानणाऱ्या नेत्यांचा समाचार घेतला. ‘भाजप’वर टीका करताना ती अधिक टोकदार करीत ठाकरे म्हणाले, सरकारी बाबू आकडेवारी सांगतात, पण खरोखर ४० लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होतो की नाही, हे तपासण्याची गरज आहे. नगर व नाशिक भागांतील शेतकरी या निणर्यानंतरही अस्वस्थच आहेत. अशांत आहेत. ज्या गावातून शेतकरी आंदोलन उभे ठाकले त्या पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडत नसल्याचे त्यांनी सांगितले. नगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकरी नाराज असल्याचे सांगत कर्जमाफीच्या विभागवार याद्या सरकारने उपलब्ध करून द्याव्यात, असे म्हटले. उगीच निर्णय जाहीर करून भ्रमात राहता कामा नये, असेही ते म्हणाले. या कर्जमाफीच्या निर्णयामुळे तुम्ही खूश आहात काय, या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात देता येणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपविरोधी सूर लावला.

कर्जमाफीबरोबरच जिल्हा बँकांच्या नोटांचा प्रश्नही शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळेच सुटल्याचा दावा त्यांनी केला. गॅसवरील सबसिडी सोडणारे नक्की दोन कोटी लोक कोण, असा सवाल विचारत या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

त्यांना सांगावे लागते..

कर्जमाफीच्या निर्णयाचे भाजपकडून होणाऱ्या फलकबाजीवर उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांना हे सांगावं लागतं. मला सांगावंच लागत नाही. कारण आम्ही शेतकऱ्यांबरोबरच असतो. ‘साले’ बोलणाऱ्यांकडून कर्जमाफी करून घेतली आहे.