वीज पडल्याने बीडमध्ये एकाचा मृत्यू

मराठवाडय़ात ठिकठिकाणी शुक्रवारी दुपारी दमदार अवकाळी पाऊस बरसला. या वेळी काही ठिकाणी गारांचीही वृष्टी झाली. लातूर, बीड, परभणी आदी जिल्ह्य़ांत हा पाऊस झाला. बीड जिल्ह्य़ातील अंबाजोगाई तालुक्यात शेतकऱ्यांचा वीज पडून जागीच मृत्यू झाला.

लातूरच्या निलंगा व चाकूर तालुक्यांत दुपारी सव्वातास दमदार अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात अनेक ठिकाणी झाडे पडून मोठे नुकसान झाले. चाकूर व परिसरात गारांचे प्रमाण अधिक होते. औराद शहाजनी, हलगरा, सावरी, शेळगी, कोटमाळ, अन्सरवाडा, निलंगा, लांबोटा, निटूर परिसरात चांगला पाऊस झाला. अहमदपूरलाही काही वेळ जोरदार वृष्टी झाली. चाकूरसह चापोली, वडवळ नागनाथ, आष्टामोड परिसरात दुपारी साडेतीनच्या सुमारास मेघगर्जनेसह जोराचा पाऊस झाला. पाऊण तास झालेल्या पावसात गारांचे प्रमाण लक्षणीय होते.

गारपीट झाल्यामुळे मान्सूनचा पाऊस लांबत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांच्या गाठीशी असल्यामुळे ही गारपीट त्यांच्यासाठी भीती निर्माण करणारी ठरली आहे.

बीड जिल्ह्य़ाच्या घाटनांदूर, तळणी परिसरात दुपारच्या सुमारास वादळी वारे, गारांसह अवकाळी पाऊस झाला. जिल्ह्य़ात दिवसभर प्रचंड उकाडा होता. मात्र, दुपारनंतर वातावरणात एकदम बदल होऊन अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. मात्र, अवकाळी पावसामुळे उकाडा प्रचंड वाढला असून, जीवाची काहिली होऊ लागली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर परिसरात धोंडवाडी येथे दुपारी शेतात काम करीत असलेल्या अशोक नरहरी धोंड (वय ५५) यांचा वीज पडून जागीच मृत्यू झाला. दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. तालुक्यातील घाटनांदूर, तळणी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.

परभणी शहर परिसरात दुपारी तीनच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. पूर्णा व पालम तालुक्यांत गारपिटीसह पाऊस झाला.  सकाळपासूनच जिल्हाभर ढगाळ वातावरण होते. दुपारी एकदम वातावरणात बदल झाला.

पूर्णा, पालममध्ये गारपीट

पूर्णा व पालम तालुक्यांत १५ मिनिटे गारांचा पाऊस झाला. सुपारीएवढय़ा आकाराच्या या गारा होत्या. पूर्णा तहसील परिसरात गारांचा सडा पडला होता. पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे, गोळेगाव आदी गावांत गारपीट झाली. पालम तालुक्याच्या काही गावांतही गारपीट झाली. पूर्णा-पालम तालुक्यांत गारपीट झाली असली, तरी या गारपिटीमुळे शेतात पिके नसल्याने फारसे नुकसान झाले नाही. काही ठिकाणी आंब्याचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती मिळाली.