डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या जलयुक्त विद्यापीठ मोहिमेस राज्य सरकारने २५ लाखांचा निधी देऊन सकारात्मक प्रतिसाद दिला. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केलेल्या मागणीला विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी मान्यता दिली.

महाराष्ट्रदिनापासून विद्यापीठात जलयुक्त विद्यापीठ मोहीम राबवण्यात येत आहे. जालना येथील अरुनिमा फाऊंडेशनचे रघुनंदन लाहोटी यांनी मोफत पोकलेन उपलब्ध करून दिले. मोहिमेत आतापर्यंत इतिहास वस्तुसंग्रहालयासमोरील परिसर, वनस्पती उद्यानसमोरील नाला, मुख्य प्रशासकीय इमारत व विद्यार्थी कल्याण विभागासमोरील नाल्याचे काम करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात सोनेरी महल परिसरात काम हाती घेण्यात आले आहे. या संदर्भात राज्य सरकारतर्फे आíथक सहकार्य देण्यात यावे, असा प्रस्ताव देण्यात आला. विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांची कुलगुरू डॉ. चोपडे, कुलसचिव डॉ. मुरलीधर लोखंडे,  विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे, कार्यकारी अभियंता रवींद्र काळे यांनी भेट घेतली होती. मुख्यमंत्री सहायता निधीतून मराठवाडा दुष्काळ निवारण निधी स्थापन करण्यात आला. या निधीतून विद्यापीठास २५ लाख रुपये देण्यात आले आहेत. यामध्ये डोंगराच्या पायथ्याशी खोल चर खोदणे, त्यावर वृक्षलागवड करणे, सिमेंट बंधाऱ्यांची साठवण क्षमता वाढवणे आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण करून सरळीकरण करणे तसेच बांधावर वृक्षलागवड करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.