औरंगाबाद राजूर बसचे चालक आणि वाहक यांना कर्तव्यावर असताना मारहाण करण्यात आली. शनिवारी (दि. २९) दुपारी सुंदरवाडी फाटा इथे ही घटना घडली. या मारहाणीत दोघेही जखमी झाले आहेत. जे. पी. मांडवत असे जखमी चालकाचे नाव असून त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. तर चालक ए. के. काकडे यांचा हात मोडला आहे.
औरंगाबादहून राजूरकडे जात असताना बसमधील एक प्रवासी दरवाज्यात उभा होता. त्याला दरवाजात उभे राहण्यासाठी वाहक काकडे यांनी मज्जाव केला. त्यावरून प्रवासी आणि काकडे यांच्यात बाचाबाची झाली. सुंदरवाडी फाटा इथे प्रवासी उतरला. मात्र राजूर येथून बस परत येत असताना १० ते १५ जणांनी बस थांबवून काकडे व मांडवत यांना मारहाण केली. या घटनेविरोधात बदनापूर पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्तव्यावर असताना मारहाण झाल्यामुळे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात करण्यात येत आहे. या घटनेचे पडसाद औरंगाबाद बस आगारात पाहायला मिळाले. औरंगाबादच्या मध्यवर्ती बस स्थानकात मारहाणीच्या निषेधार्थ चक्का जाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती.