मिरवणुकीत पंजाबहून आलेले १०० घोडे

दसरा, शीख समाजाचा हल्लाबोल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन, धम्मचक्र प्रवर्तनदिन व मोहरमच्या पाश्र्वभूमीवर नांदेड शहर व परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिसंवेदनशील भागावर पोलिसांची विशेष नजर आहे.

नांदेडमध्ये जगप्रसिद्ध गुरुद्वारा आहे. दसऱ्यानिमित्त शीख बांधवांतर्फे प्रतीकात्मक हल्लाबोल मिरवणूक निघते. या सोहळय़ासाठी देशातूनच नव्हे तर जगभरातून हजारो भाविक मोठय़ा संख्येने दाखल होतात. आता अनेक भाविक शहरात दाखल झाले आहेत. विशेषत: पंजाबमधून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. अरदास झाल्यानंतर निघणारी ही मिरवणूक चिखलवाडी माग्रे िहगोली गेट परिसरात येते. शस्त्रास्त्रपूजन झाल्यानंतर चिखलवाडीपासून प्रतीकात्मक हल्लाबोल केला जातो. या मिरवणुकीला गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. शिवाय त्याला धार्मिक महत्त्व आहे. या मिरवणुकीत वेगवेगळय़ा भागातून आलेले हजारो भाविक मोठय़ा उत्साहाने सहभागी होतात. पंजाब, कर्नाटक, बिहार या राज्यांतील वेगवेगळे जथ्थे, विशेष दल नांदेडात दाखल झाले आहेत. पंजाबमधून सुमारे १०० घोडे या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच दाखल झाले आहेत.

दसरा, शीख समाजाचा हल्लाबोल महोत्सव या पाश्र्वभूमीवर नांदेड पोलीस प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्त लावला आहे. राज्य राखीव दलाची तुकडीही वेगवेगळय़ा भागांत तनात करण्यात आली आहे. अतिसंवेदनशील भागावर पोलिसांची विशेष नजर असणार आहे. दसऱ्या पाठोपाठ बुधवारी मोहरमचा उत्सव असल्याने पोलिसांनी आपली सुरक्षा यंत्रणा अधिकच कडक केली आहे. बुधवारी दुर्गा विसर्जन मिरवणूक व मोहरम एकाच दिवशी आल्याने पोलिसांची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन होणार आहे. दुपारी दसऱ्यानिमित्त बालाजी मंदिरापासून पथयात्रा निघणार आहे. सायंकाळी हल्लाबोलची मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त मिरवणूक निघणार आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर पोलिसांनी शहराच्या सर्वच भागांत बंदोबस्त लावला आहे. शहर विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले, की या सर्व सणाच्या पाश्र्वभूमीवर आम्ही सर्व तयारी केली आहे. एकादशी असल्याने काही दुर्गादेवीचे मंडळ मिरवणूक बुधवारऐवजी गुरुवारी काढण्याची शक्यता आहे. शिवाय मोहरमच्या मिरवणुकाही वेळेत पूर्ण होतील.

या सर्व सणांच्या पाश्र्वभूमीवर गेल्या आठवडाभरात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. शिवाय समाजकंटकांवर आमची विशेष नजर आहे. नागरिकांनी आपापले सण-उत्सव उत्साहात साजरे करताना इतर समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन महेंद्र पंडित यांनी केले.