दारोदारी रांगोळी, पाहुण्यांसाठी ढोलताशे, स्वागतासाठी शाल-श्रीफळ, अस्सल मराठवाडी बोलीमध्ये प्रास्ताविक आणि ते भाषांतर करण्यासाठी दुभाषक, अशा वातावरणात औरंगाबाद जिल्ह्यातील तीन गावांमधील नदी पुनरुज्जीवनाची कामे इस्रायलचे उच्चायुक्त डेव्हिड अकाव्ह व सहकाऱ्यांनी पाहिली. मात्र, या निमित्ताने दौऱ्यातील सर्वानाच लक्ष्मण देशपांडे यांच्या ‘वऱ्हाडा’ची आठवण आवर्जून झाली!
दुपारी तीनच्या सुमारास एकोड गावामध्ये गोऱ्या कातडीचा गावात आलेला माणूस पाहण्यासाठी गावकऱ्यांची मोठी झुंबड उडाली. समोर ढोल-ताशे वाजत होते. सत्काराचे छोटेखानी कार्यक्रम सुरू होते. चिंचोळ्या रस्त्यातून फुफाटा उडवत गाडय़ांचा ताफा पुढे जात होता. अधिकारी माहिती पुस्तिका हातात घेऊन मिरवत होते. कोरडय़ा नदीपात्रात पाहणी सुरू होती. हे काम कसे चांगले झाले, हे सांगण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या वेळी उपस्थित होत्या.
नदी पुनरुज्जीवनाचे काम पाहिल्यानंतर आकाव्ह यांनी हे काम स्पृहणीय असल्याचे निरीक्षण नोंदवले. महाराष्ट्र, विशेषत: मराठवाडय़ात दुष्काळग्रस्तांसाठी कमी पाण्यात अधिक उत्पादनाचे तंत्रज्ञान देण्याकडे इस्रायलचा कल असेल. या दृष्टीने नक्की पावले उचलू, असे ते म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेमुळे चांगला पाऊस झाला तर पाणी अडेल. मात्र, त्याचा योग्य उपयोग करण्यासाठी इस्रायल तंत्रज्ञान आवश्यक ठरू शकेल. ते मिळविण्यास प्रयत्न करू, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
चित्ते नदीच्या पात्राचे ८ किलोमीटर खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले आहे. या भागात २०१२ पासून सुरू असणाऱ्या पाणलोटाच्या कामाचा चांगला फायदा झाल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. गावातील गंगुबाई ही महिला म्हणाली, ‘‘आता गावातून दररोज ५ हजार लिटर दूध दररोज औरंगाबादला जाते. केवळ नदीचे खोलीकरण, रुंदीकरणच नाही तर अन्य पाणलोटाच्या उपाययोजनेमुळे राहणीमानात फरक पडला आहे.’’
मात्र, दोन विदेशी पाहुणे गावात आले की मराठवाडय़ातील माणसे कशी वागतात याचे ‘वऱ्हाड’मधील वर्णन प्रत्यक्षात अनुभवता यावे, असेच वातावरण या तीन गावांमध्ये होते. अर्थात, ‘वऱ्हाड’मधील ‘बबन्या’ या दुभाषकाची इंग्रजी कच्ची होती. या वेळी मात्र अगदी पाश्चिमात्य उच्चारांसह दुभाषकांनी चोख कामगिरी बजावली. दौऱ्यात सरकारी अधिकाऱ्यांना माहिती सोबत ठेवण्यापलीकडे काही कामच नव्हते. मात्र, या दौऱ्यानिमित्त दुष्काळी भागात जलयुक्त शिवार योजनेचे ढोल पुन्हा एकदा जोरदारपणे वाजवण्यात आले. ग्रामविकास संस्थेच्या वतीने या गावांत योजनेची कामे झाली आहेत.