लातूरला कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा यासाठी लातूरचे महापौर सक्रिय झाले असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन उजनीतून लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती त्यांनी केली. त्यांच्या समवेत शिवराज पाटील चाकूरकर यांचे चिरंजीव शैलेश पाटील उपस्थित होते.
महापौर अख्तर शेख यांनी लातूर शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्याचा प्रश्न मनावर घेतला असून मागील पंधरवडय़ात केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांना भेटून त्यांनी उजनीहून लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आíथक तरतूद करण्याची विनंती केली. मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी निवेदन दिले. नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांनाही ते भेटले. शुक्रवारी थेट राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटून त्यांनी लातूरच्या पाण्याची तीव्रता त्यांच्यापर्यंत पोहोचवली. राष्ट्रपतींनी आपण या प्रश्नात लक्ष घालू, तुम्ही चिंता करू नका, असे सांगितले असल्याचे महापौर म्हणाले.