औरंगाबाद शहरात पाडव्याच्या दिवशी पाणीपुरवठा न झाल्यामुळे ‘पाणीबाणी’ची स्थिती निर्माण झाली. पाणी नसल्यामुळे पाडवा सण साजरा करण्यापूर्वी कोणाला घागरीने बोअर वरून आणावे लागले, तर बहुतेकांनी टँकर विकत घेऊन पाडवा साजरा केला. शहरात विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यास अपयश आल्याने शिवसेनेचे नगरसेवक राजू वैद्य यांनी पाणीपुरवठाचे विभगाचे चहल यांना या पदावरून हटविण्याची मागणी आयुक्तांकडे केली. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी एकीकडे आयुक्त लाइनमन बरोबर बैठका घेत असले, तरी जलवाहिनीच्या गळत्या दुरुस्त न झाल्यामुळे शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही.

पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत होणारा पुरवठा दिवसा कसा आणता येईल, यासाठी आयुक्तांनी नुकतीच बैठक घेतली. जलवाहिन्यांना गळती असतानाच चित्तेगावजवळ व्हॉल्व फोडल्यामुळे पाणीप्रश्न निर्माण झाला असल्याचे सांगितले जाते. एका बाजूला शहरातील वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा होत नसताना काही हॉटेल्स आणि  गाडय़ा धुण्याचे सेंटरला मात्र २४ तास पाणीपुरवठा होत आहे. आठ दिवसांच्या अंतराने दोन वेळा पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे औरंगाबादकर हैराण झाले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातशे व चौदाशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील गळत्या दुरुस्त करत असतानाच रेल्वेस्टेशन पुलाभोवती मुख्य जलवाहिनीला गळती लागली. परिणामी औरंगाबाद शहरात पाडव्याच्या दिवशी ‘पाणीबाणी’ची स्थिती होती.