औरंगबाद महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणी प्रश्नावर भाजप आणि एमआयएम यांच्यात चांगलीच जुंपली. एमआयएमचे नगरसेवक वॉर्डातील पाणी प्रश्न मांडत असताना भाजप नगरसेवकाकडून पाणी पुरवठा अधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्यामुळे स्थायीच्या बैठकीतच नगरसेवकांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाला. सभापती आणि इतर नगरसेवकांनी याप्रकरणी मध्यस्थी करत दोन्ही नगरसेवकांना शांत केलं. त्यानंतर सभापती गजानन बारवाल यांनी पाणी पुरवठा अधिकारी यांना पक्षपातीपणा करू नका, अशी सूचना केली.

शहरातील पाण्याच्या समस्येमुळे दर चार दिवसांनी पालिकेवर मोर्चे येतात. प्रत्येक स्थायी समितीच्या बैठकीत पाणी समस्येवर चर्चा होते. एमआयएमचे नगरसेवक अजीम खान आणि नगरसेविका संगिता वाघुले यांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत हा मुद्दा मांडला. त्याबाबत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात. तेव्हा भाजप नगरसेवक राज वानखेडे यांनी अचानकपणे पालिका अधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. आपल्या वॉर्डातील काही भागात मागील ३० वर्षांपासून पाणी पुरवठा होत नव्हता. त्या भागात पाणी पुरवठा सुरु केल्याबद्दल पाणीपुरवठा विभागाचा अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यामुळे एमआयएम नगरसेवक अजीम खान आणि भाजप नगरसेवक वानखेडे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. शेवटी इतर नगरसेवक आणि सभापती यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केलं.

आपल्या वॉर्डात गैरसोय झाली तर आपण अधिकाऱ्यांना धारेवर धरतो. सोय केल्यानंतर अभिनंदन करायला हवं असं मत वानखेडे यांनी मांडलं. तर शहरात बऱ्याच भागात पाण्याची गैरसोय आहे. त्याबाबत आम्ही बोलत असताना हा ठराव कशासाठी मांडण्यात आला, असा प्रश्न ‘एमआयएम’कडून उपस्थित करण्यात आला.