पाच लाख लोकसंख्येचे लातूर शहर आता पूर्णत: टँकरवर आले आहे. परभणी शहराला गेल्या १५ वर्षांत एकदाही दररोज पाणीपुरवठा झाला नाही. मराठवाडय़ातील बहुतांश शहरांमध्ये सरासरी ८ दिवसांतून एकदा पाणी मिळते. औरंगाबादसारख्या प्रमुख शहरात तीन दिवसांतून एकदा पाणी देण्याची पद्धत मागील चार वर्षांपासून रुजली आहे. पाणीपुरवठा योजनांच्या निविदांमध्ये कधी घोटाळे झाले, तर कधी कंत्राटदाराने कामच पुढे नेले नाही. जेव्हा पाणी होते तेव्हाही पाणीपुरवठा नीट नव्हता आणि आता तर पाण्याचे स्रोतच आटल्याने शहरी भागातील पाणीपुरवठय़ाची समस्या गंभीर झाली आहे.
औरंगाबाद – औरंगाबाद शहराला गेल्या दोन वर्षांपासून तीन दिवसांनी पाणीपुरवठा होतो. जलवाहिनीला लागलेली गळती एवढी होती, की नवीन जलवाहिनी टाकणे अपरिहार्य होते. त्यामुळे मोठा गाजावाजा करून समांतर जलवाहिनीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ७२१ कोटींची योजना तयार झाली. मंजूर झाल्यानंतर त्याचा डंका पिटला गेला. मात्र, निविदांचे घोळ आणि कंत्राटदाराच्या मनमानीमुळे अलिकडेच कसेबसे काम सुरू झाले. योजना कधी पूर्ण होईल, हे माहीत नाही. त्यामुळे दर तीन दिवसांआड पाणी याची शहरवासीयांना सवय झाली आहे. औरंगाबाद शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा होतो. आजघडीला धरणात ६ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. तो जुलैअखेपर्यंत पुरू शकेल.
नांदेड – नांदेड शहराला विष्णुपुरी धरणातून पाणीपुरवठा होतो. सरासरी तीन दिवसांनी एकदा पाणी दिले जाते. चार महिन्यांपूर्वी एक दिवसाआड पाणी दिले जायचे. या शहराअंतर्गत जलवाहिन्यांना गळती नसल्याचा दावा केला जातो. १० किलोमीटरवरून प्रतिदिन १० दशलक्ष लिटर पाणीउपसा होतो. धरणातील पाणी कमी झाल्यामुळे आता दर तीन दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे एका धरणातील पाणी संपले तर इसापूर धरणातून १४ कोटी रुपये खर्चून पर्यायी पाणीपुरवठाची योजना तयार आहे. त्यामुळे मराठवाडय़ात या जिल्ह्य़ाचा पाणीपुरवठा तुलनेने चांगला मानला जातो.
लातूर – पाच लाख लोकसंख्येचे लातूर शहर सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. कारण धनेगाव येथून केला जाणारा पाणीपुरवठा स्रोत आटल्यामुळे होऊ शकत नाही. शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची चर्चा झाली. त्याचे पुढे काहीच झाले नाही. उजनी धरणातून पाणीपुरवठय़ाची योजना मंजूर करू, असे सांगितले गेले. घोडे अडले ते अडलेच. दाही दिशांना पाण्याचा स्रोत शोधून झाला. काही ठिकाणी पाणी उपलब्धही होते. मात्र, केवळ प्रशासकीय उदासीनतेमुळे संपूर्ण शहर टँकरवर अवलंबून ठेवण्यात आले आहे. लातूरचा पाणी बाजार कोटय़वधींच्या घरात गेला आहे.
बीड – बीड शहराला माजलगाव धरणातून पाणीपुरवठा होतो. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने शहरात आठ दिवसांनी एकदा पाणी सोडले जाते. शहराचे सहा विभाग करण्यात आले असून प्रत्येक विभागात वेगवेगळ्या दिवशी पाणीपुरवठा होतो. जलस्रोत आटल्याने बीड शहराची अडचण झाली आहे. प्रतिदिन २१ दशलक्ष लिटर होणारा पाण्याचा उपसा शहराभोवतालच्या वस्त्यांपर्यंत पोहोचू शकत नसल्याने तेथील पाणीपुरवठा टँकरवर करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
उस्मानाबाद – १८० कोटी रुपयांची उजनी धरणावरून केलेली पाणीपुरवठा योजना सुरू झाली खरी; मात्र, वीजदेयक आणि अंतर्गत वीजवाहिनीचे काम अपूर्ण राहिल्याने शहरातील काही भागात आठ दिवसांनी, काही भागात १० दिवसांनी, तर कोठे १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो. गेल्या २० वर्षांपासून या शहरात कधीही दररोज पाणीपुरवठा होऊ शकला नाही.
परभणी – रहाटी नदीत बंधारा बांधून येलदरी धरणावरून पाणी आणून साठविले जाते आणि त्यातून शहराला पाणीपुरवठा होतो. शहरासाठी मंजूर झालेली वाढीव पाणीपुरवठा योजना तशी पूर्णच झाली नाही. पाच-सात वर्षांपासून रखडलेले काम पुढे सरकले नाही. परिणामी, गेल्या १५ वर्षांत या शहराला दररोज पाणीपुरवठा होऊ शकला नाही.
हिंगोली – हिंगोली शहरातही दर तीन दिवसांनी एकदा पाणी सोडले जाते. जुलैअखेपर्यंत सिद्धेश्वर धरणातील पाणी पुरेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. प्रतिदिन ५.१५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. पाणीसाठाही आहे. मात्र, पुरवठा दररोज केला जात नाही.
जालना – जालना शहराला कधी सहा, तर कधी सात दिवसांनी पाणीपुरवठा होतो. २०१२ च्या दुष्काळात शहराला पाणीपुरवठा करणारी योजना कोलमडली होती. परिणामी पाणीबाजार टिपेला होता. आता पाणीपुरवठा योजना झाल्यानंतरही ८३ किलोमीटरवर असणाऱ्या जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा होतो. शहरात ३० ते ३५ टक्के भागात अजूनही अंतर्गत जलवाहिनी नाही. परिणामी त्या भागातील नागरिक कूपनलिकेद्वारे पाणी उपसतात. योजना पूर्ण होऊनही दररोज पाणी मिळू शकले नाही.