दोन दिवसांत समस्या सोडविण्याचे आयुक्तांचे आश्वासन

शहरातील हडका व सिडको भागात होणाऱ्या अपुऱ्या व अवेळी पाणीपुरवठय़ामुळे चिडलेले नगरसेवक बुधवारी महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना जाब विचारण्यासाठी गेले होते. मात्र, महापालिका आयुक्त बैठकीत असल्याने नगरसेवकांना तातडीने भेटण्याचे टाळले. त्यामुळे महापालिकेत आज बराच गोंधळ झाला. आयुक्त बकोरिया नीट काम करत नसल्याचा आरोप नगरसेवक राजगौरव वानखेडे, नितीन चित्ते यांनी केला आहे. दरम्यान या गोंधळास औरंगाबाद वॉटर युटीलिटी कंपनीने करून ठेवलेले घोळ कारणीभूत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्यांनी केलेल्या चुकीच्या कामाचे परिणाम आता जाणव असल्याचे ते म्हणाले. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर नगरसेवकांनी महापालिका सोडली.

गेल्या काही दिवसांपासून कामे होत नसल्याची ओरड नगरसेवकांकडून होत होती. यात अपुऱ्या पाणीपुरवठय़ाची भर पडली. त्यामुळे आयुक्त काम करत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. सकाळी सिडको येथे पाण्याच्या टाकीजवळ नगरसेवक जमले होते. मात्र, पाणीपुरवठय़ाची नक्की अडचण न कळाल्याने त्यांनी महापालिकेत जाऊन आयुक्तांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. सकाळच्या सत्रात आयुक्त बकोरिया डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात बैठक घेत होते. या बैठकीत एक नगरसेवक घुसला. त्यांना आयुक्तांनी बाहेर जाण्यास सांगितले, त्यामुळे रोषात भर पडली. ऐन दिवाळी पाण्याचा प्रश्न नागरिकांसाठी जिव्हाळय़ाचा असल्याने भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणीही महापालिकेत गेले. आयुक्त नगरसेवकांची तर काम करतच नाहीत. पाण्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नाकडेही लक्ष देत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. दरम्यान दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर नगरसेवकांचा राग शांत झाला.