तीव्र पाणीटंचाईमुळे संपूर्ण जिल्हा टँकरच्या मागे धावू लागला आहे. ८५० टँकरच्या माध्यमातून ७१३ गावे आणि ५४८ वाडय़ांची तहान भागवली जात आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये पाण्याचे स्रोत कमी पडू लागले असतानाच दूषित पाणी पिण्याची वेळ लोकांवर येऊ लागली आहे. एक हजार पकी २५७ पाण्याचे नमुने दूषित आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
बीड जिल्ह्यात १४२ लघु, मध्यम प्रकल्प आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठय़ा प्रमाणात होऊ लागल्याने बहुतांश प्रकल्प कोरडे पडले आहेत तर काही ठिकाणी मृतसाठा शिल्लक आहे. भीषण पाणीटंचाईमुळे संपूर्ण जिल्हा टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. ग्रामीणसह शहरी भागातही टँकरने पाणी पुरविले जात आहे. ८५० टँकरच्या माध्यमातून १९७१ खेपा केल्या जात आहेत. दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढू लागली आहे. जानेवारी ते मार्च २०१६ अखेर ६० कोटी ५ लाख ५५ हजार रुपयांचा टंचाई कृती आराखडा मंजूर झालेला आहे. एप्रिल ते जून २०१६ अखेर टंचाई कृती आराखडय़ासाठी ३२ कोटी ४२ लाख ३७ हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. लोकांची तहान भागवण्यासाठी पाण्यासारखा पसा खर्च करूनही त्यांना शुद्ध पाणीपुरवठा केला जात नाही. पाण्याचे स्रोत आटू लागल्याने टँकर भरायचे कोठून, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच ऐन दुष्काळात लोकांना दूषित पाण्याचा डोस दिला जाऊ लागला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत ९ हजार ४१० पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहेत. त्यापकी १ हजार ४२ ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. बीड तालुक्यात ४३, गेवराई ४५, माजलगाव २५, अंबाजोगाई १४, केज २०, वडवणी ७, आष्टी ३७, पाटोदा २०, शिरूर २६, धारूर १५, परळी ५, या प्रमाणे २४.६६ टक्के म्हणजेच २५७ नमुने दूषित आढळून आले आहेत.
पिण्याच्या पाण्यासाठी मारामार होत असताना तहान भागविण्यासाठी मिळेल त्या पाण्याचा वापर केला जात आहे. परिणामी दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला असून अनेक प्रकारचे आजार वाढू लागले आहेत.