जिल्हय़ातील ७ मध्य व ५७ लघु प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी सात टक्केच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. १३० टँकरद्वारे ९६ गावे आणि ३८ वाडय़ांना पाणीपुरवठा केला जात असून, शासकीय पातळीवर पिण्याच्या पाण्यासाठी एकूण १४५ खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. भूजल सर्वेक्षण विभागाने जानेवारीत केलेल्या निरीक्षणात जिल्हय़ातील भूजलपातळी गेल्या वर्षांच्या तुलनेत १.१५ मीटरने खाली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. फेब्रुवारीपासून पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
जिल्हय़ात २२ लघुसिंचन प्रकल्प पूर्ण कोरडे पडले असून २७ प्रकल्पांतील पाणीपातळी जोत्याच्या खाली आहे. २६ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा असलेल्या लघु प्रकल्पांची संख्या केवळ पाच आहे. सातपैकी पाच मध्यम प्रकल्पांतील जलसाठा २५ टक्क्यांपेक्षा कमी असून, त्यापेक्षा अधिक जलसाठा असलेले प्रकल्प दोन आहेत. सर्वाधिक २६ टँकर अंबड तालुक्यात असून अन्य तालुक्यातील हा आकडा पुढीलप्रमाणे- जालना २३, भोकरदन २२, जाफराबाद १८, परतूर ८, मंठा १३, घनसावंगी ७, बदनापूर १२.
९६ गावे आणि २८ वाडय़ांमधील १ लाख ८५ हजार जनता टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. जिल्हय़ात १४५ विहिरी पाणीपुवठय़ासाठी अधिग्रहीत करण्यात आल्या असून त्यातील सर्वाधिक ४६ जालना तालुक्यातील आहेत. एकूण १५७ गावांमधील या विहिरी असून, यातील ११६ गावांमधील विहिरी टँकरसाठी अधिग्रहीत केल्या आहेत.
कमी पावसामुळे जिल्हय़ात भूगर्भामधील पाणीपातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत खाली गेल्यामुळे पाणीप्रश्नाची तीव्रता वाढण्यात भर पडत आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणेने जानेवारीत ११० विहिरींच्या पाणीपातळीचे निरीक्षण केले. या विहिरींची तालुकानिहाय संख्या अशी : जालना १५, बदनापूर १२, भोकरदन २५, जाफराबाद १३, परतूर १९, अंबड १० घनसावंगी १३. जिल्हय़ातील भूजलपातळी सरासरी १.१५ मीटरने खोल गेल्याचे या निरीक्षणात आढळले. घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक २.१६ मीटर, तर भोकरदन तालुक्यात सर्वात कमी ०.३७ मीटर भूजलपातळी खाली गेल्याचे आढळून आले. दिवसेंदिवस विंधन विहिरींची पाणीपातळी कमी होत चालली आहे. मध्यम व लघुसिंचन प्रकल्पांप्रमाणेच अन्य तलावांतील जलसाठा मोठय़ा प्रमाणावर कमी झाला असून, अनेक तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे विहिरी आणि विंधन विहिरींचे पाणीही दिवसेंदिवस कमी होत चालले आहे.