पैठण शहरातील अनेक भागात दूषित पाणी पुरवठा होत आहे. स्वच्छ पाणी मिळावं यासाठी ग्रामस्थांनी नगरपरिषदेला अनेक निवेदन दिली. मात्र प्रशासनाकडून त्याची दखल घेतली गेली नाही. पाणी पुरवठ्यासंदर्भातील समस्येसाठी महिलांनी मंगळवारी मोर्चा काढला. मात्र निवेदन घ्यायला कार्यालयात अधिकारीच नव्हते. त्यामुळे संतप्त महिलांनी सोबत आणलेली मडकी फोडून प्रशासनाचा भोंगळ कारभाराविरोधात निषेध व्यक्त केला.

दहा दिवसांपासून शहरातील पावर हाऊस, दलित वस्ती, कहारवाडा, जोहरिवाडा, नेहरूचौक, दारुस्लाम,सादात मोहल्ला, धनगरवाडा, सालीवाडा या भागात गढूळ पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. लहान मूल आणि जेष्ठ नागरिकांना या गोष्टीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करावा, अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे. मात्र त्याच्या मागणीची कसलीही दखल प्रशासनाकडून घेतली जात नाही.
दूषित पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्यामुळे शुद्ध पाणी पुरवठाच्या मागणी करता महिलांनी पैठण नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढला. मात्र निवेदन घेण्यासाठी मुख्याधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे  संतप्त महिलांनी सोबत आणलेले मडकी फोडून निषेध व्यक्त केला. त्यानंतर उप मुख्याधिकारी दिलीप साळवे यांना निवेदनाची प्रत देण्यात आली.