गोरखपूर घटनेतील मृतांची जबाबदारी स्वीकारत योगी आदिथ्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी येथे केली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सध्याचे सरकार टीव्ही आणि जाहिरातीवर सुरु आहे. सरकारने निवडणुकीअगोदर केलेल्या कोणत्याही घोषणांची पूर्तता केलेली नाही. पंतप्रधान फक्त टीव्हीवर ‘मन की बात’ करतात आणि हवेत फिरतात. त्यामुळे हे सरकार टीव्हीवर आणि हवेवर सुरु आहे. प्रत्यक्षात काहीही काम नाही, असा आरोप गुलाब नबी आझाद यांनी केला. तर दुसरीकडे प्रत्येकाच्या मनात असुरक्षतेची भावना आहे.

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या वक्तव्यावर बोलताना, आरएसएस सोडले तर या देशात सुरक्षित कोणीही नाही, असा टोलाही आझाद यांनी लगावला. नोटाबंदीमुळे रियल इस्टेट, उद्योग यांना मोठा फटका बसला तसेच लोकांचा रोजगारही हातचा गेला. त्यामुळे देशाचा विकासच थांबला असल्याचा आरोपही गुलाब नबी आझाद यांनी केला.

उत्तरप्रदेशातील गोरखपूरमध्ये बाबा राघवदास रूग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा ठप्प झाल्याने ३६ मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. ६९ लाख रूपयांचे बिल थकल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने गुरूवारी रात्रीपासूनच या रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा बंद केला होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यातील गोरखपूर जिल्ह्यात ही घटना घडली होती.