आपल्या विवाहाची हुंडय़ाची जुळवाजुळव करताना वडिलांची होणारी ससेहोलपट पाहून निराश झालेल्या तरुणीने मृत्यूला कवटाळले.
मोहिनी पांडुरंग भिसे (वय १८, भिसेवाघोली, तालुका लातूर) असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. मोहिनीने बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.
मोहिनीच्या विवाहाच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, येणारे प्रत्येक स्थळ किती हुंडा देणार, असा प्रश्न विचारत असे. परंतु मोहिनीच्या आई-वडिलांची सांपत्तिक स्थिती बिकट असल्याने केवळ हुंडय़ाची रक्कम जुळवता न आल्याने विवाहाची बोलणी फिसकटत होती. या प्रकाराने निराशेच्या गर्तेत सापडलेल्या मोहिनीने अखेर मृत्यूला जवळ केले. हुंडय़ासाठी वडिलांची ससेहोलपट लक्षात घेऊन मोहिनीने नैराश्याच्या भरात चिठ्ठी लिहून आपली व्यथा मांडली.
पांडुरंग भिसे यांच्या नावावर केवळ ४४ गुंठे जमीन आहे. पती-पत्नी दोघेही मोलमजुरी करून कुटुंब चालवतात. त्यांच्या कुटुंबात दोन मुली व मुलगा असे तिघे असून लहान बहीण इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत आहे. मोहिनीने बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षण थांबवले. तिच्या विवाहासाठी स्थळे येत होती. मात्र, येणारा प्रत्येकजण हुंडा किती देणार? हाच प्रश्न विचारत होता. अनेक वेळा पसंती येऊनही लग्नाच्या बोलाचाली केवळ हुंडय़ावर फिसकटल्या. आधीच शेतात नापिकी असल्यामुळे वडील कर्जबाजारी आहेत. रोजची मजुरीही मिळत नाही. त्यामुळे मोहिनी निराश झाली होती.
आत्महत्येपूर्वी तिने वडिलांना चिठ्ठी लिहून ठेवली होती. कोणी स्थळ पाहण्यास आले की पहिल्यांदा हुंडा किती देणार असे विचारतात. प्रत्येकजण हुंडा का मागतो? ही प्रथा केव्हा मोडणार? मुलीच्या बापानेच का झुकायचे? म्हणून मी आत्महत्या करीत आहे. मी गेल्यानंतर तुम्ही गोड जेवणाचा खर्च करू नका, वर्षश्राद्ध करू नका, रडू नका, यातच माझ्या आत्म्याला शांती मिळेल, असे मोहिनीने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.
शवविच्छेदनानंतर तिच्या पाíथवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून हुंडय़ाच्या प्रश्नावर ग्रामीण भागात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अर्थात, आपल्याकडे केवळ चर्चा होते. कृती मात्र होत नाही. पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी स्थिती निर्माण होते. भविष्यात केव्हा तरी आणखी एखादी मोहिनी बळी जाते व तेव्हा पुन्हा चर्चा सुरू होते. हे किती काळ चालणार? यावर उपाय काय? हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत.