मराठवाडय़ात नेत्यांच्या मुलांकडेच पदे

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी सध्या काय करतात, असा प्रश्न केला की उत्तर येते, ‘आम्ही सध्या निवांत आहोत’ युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचा दीर्घ उसासा संघटनेतील शांतता सांगून जाणारा. संघटनेकडून कुठलाही कार्यक्रम आखून दिलेला नाही. स्थानिक प्रश्नांवर त्या-त्या पातळीवर निर्णय घ्यायचा, त्यात एखादा अंतर्गत खोडा घालतो. त्यानंतर सारे गुंडाळून स्वस्थ बसायचे, असे सारे सुरू आहे.

औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा वाद सुरू आहे. विविध राजकीय पक्ष, संघटनांनी या वादात उडी घेतल्यामुळे विद्यापीठाला पोलीस संरक्षणाची मागणी करावी लागली. विद्यापीठात पुढील महिन्यात युवा संसदेच्या निवडणुकाही आहेत. शिष्यवृत्तीसह इतरही अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत. विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी सेना, राष्ट्रवादी युवक आघाडी, एसएफआयसह इतरही मराठा व दलित संघटना महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूने किंवा विरोधाचा आपला अजेंडा ठेवून अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांचे वसतिगृहात राहण्यासंबंधीचे प्रश्न, शिष्यवृत्तीच्या अडचणी, परीक्षेसंदर्भातील घोळ, यासाठीही त्या-त्या संघटना आवाज उठवताना दिसतात. मात्र या सर्व पाश्र्वभूमीवर युवा सेनेची भूमिका काय, ती नेमकी कोठे आहे, पदाधिकारी सध्या काय करतात, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मध्यंतरी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेच्या निकालात जातीने लक्ष घालत असल्याचे सांगितले जात होते. विधिमंडळाच्या सभागृहातही हा विषय चर्चेला आला होता. त्यातून बराच गदारोळ झाला. कुलगुरूंसह शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याही राजीनाम्याची मागणी पुढे आली. मुंबई विद्यापीठाशी संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आदित्य ठाकरे हे स्वतच मैदानात उतरले होते. मात्र मराठवाडय़ातही विद्यार्थ्यांशी संबंधित अनेक प्रश्न असताना त्यावरून युवा सेना काही आक्रमक होताना दिसत नाही. किंबहुना ती कुठेच दिसत नाही. मध्यंतरी येथील एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी केलेल्या अश्लील चाळ्यांच्या प्रकरणात निवेदन देण्यापुरते युवा सेनेचे काही पदाधिकारी पुढे होते, हाच काय तो अपवाद!

मे महिन्यात औरंगाबाद शहराजवळील श्री साई इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना सामुदायिकरीत्या कॉपी करून पेपर सोडवताना पकडण्यात आले होते. या प्रकरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. पुढे परीक्षा विभागाला चौकशी समितीने क्लीन चीट दिली, हा भाग अलाहिदा. परंतु हे प्रकरण जिथे घडले ते निवासस्थान शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांचेच निघाले. शिवाय नगरसेवक सुरे यांचाच मुलगा विद्यार्थी म्हणून त्यात सहभागी होता. त्यामुळे हे प्रकरण शिवसेना किंवा युवा सेना कसे उचलणार, असा प्रश्न असला तरी इतरही अनेक प्रकरणांवरून विद्यापीठ वादाच्या केंद्रस्थानी येते. पीएच.डी.ची प्रवेश पूर्वप्रक्रिया (पेट) दोन वर्षे रखडली होती. त्यातही अनेक वेळा तारखेत बदल करण्यात आला. परीक्षा पेपरमधील मुद्रित घोळ, यावरूनही बरेच वाद उद्भवलेले असतात. विद्यार्थ्यांशी संबंधित अनेक प्रश्नांवर विद्यापीठात कायम आंदोलने होत राहतात. केवळ विद्यापीठच नव्हे तर इतरही महाविद्यालयांत विद्यार्थ्यांशी संबंधित बरेच प्रश्न आहेत. काही महाविद्यालयांकडून अनधिकृतरीत्या वाहनतळ शुल्क आकारले जात आहे. मोबाइल कंपन्यांमधील विलीनीकरणामुळे अनेक तरुण, युवा वर्ग बेरोजगार झाले आहेत. ते त्यांच्या स्तरावर आंदोलने करीत आहेत. त्यांचा हा प्रश्न एकाही संघटनेने स्वीकारलेला नाही. असे एक ना अनेक प्रश्न युवा वर्ग, विद्यार्थ्यांशी संबंधित असताना युवा सेनेचे पदाधिकारी मात्र सध्या कुठलाही अजेंडा नसल्याचे सांगतात.

दोन महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरे यांचे दोन वेळा दौरे ठरले. आणि ते दोन्ही दौरे अचानक रद्दही झाले. त्यामागे युवा सेनेतील दोन गटांमधील वादाची किनार असल्याचे सांगितले जाते. प्रस्थापितांच्या मुलांची प्रमुख पदावर केलेली नियुक्ती व शिवसेना किंवा सेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आकर्षणातून सर्वसामान्य घरच्या शिवसैनिकांची मुले असे ते दोन गट आहेत. त्यात सरशी होते ती नेत्यांच्या मुलांची. एखादा विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्न किंवा विद्यापीठातील पुतळ्याचा वाद असेल तिथे ज्येष्ठ शिवसैनिक, नेते तेथे पोहोचतात आणि तेच भाव खाऊन जातात. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना त्यातून लढल्याचे ना समाधान लाभते, ना संघटनेचे नाव होते. त्यामुळे जसे जमेल तसे काही तरी, कधी तरी करीत राहायचे, असाच निवांत अजेंडा सध्या युवा सेनेकडे दिसत असल्याने संघटनेला मरगळलेली अवस्था आली आहे. मराठवाडय़ातील युवा सेनेत प्रमुख पदांवर नेत्यांनीच आपल्या मुलांची वर्णी लावल्याचे दिसते. यामध्ये खासदार चंद्रकांत खर, प्रदीप जैस्वाल या शिवसेनेच्या नेत्यांचा सहभाग आहे.

औरंगाबाद जिल्ह्य़ात युवा सेनेच्या संघटनात्मक पातळीवरील काही नियुक्त्या रखडल्या आहेत. दसऱ्यानंतर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. पुढेही कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे. संघटनात्मक पातळीवर काही उपक्रम सुरू आहेत. विद्यापीठातील परीक्षा नियंत्रण केंद्राच्या कार्यपद्धतीमुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्या प्रश्नावर संघटना लवकरच आंदोलन छेडणार आहे.

ऋषीकेश खैरे, जिल्हाध्यक्ष, युवा सेना