डॉक्टरांनी सांगितलेल्या दिवसानंतर सात दिवस उशिराने माझा जन्म झाला. बाहेर लोकांना उत्सुकता लागून राहिलीय, डॉक्टरने अंदाज वर्तवलाय, त्यामुळे त्याची प्रतिष्ठा स्टेकला आहे. आपली आईपण आता बोअर झाली असेल, तर आपण वेळ पाळली पाहिजे असल्या कुठल्याही विचारांनी मला वेळ पाळायला भाग पाडले नाही. आयुष्याचा साधारण तेव्हाच निर्णय झाला होता, की आपल्याला वेळा पाळता येणार नाहीत. मी नेहमीच शब्द पाळत आलोय, श्रावण पाळलाय, कुत्रा पाळलाय, बोका पाळलाय; पण वेळ पाळायला मात्र मला अजिबात शक्य होत नाही.

माझ्यासारखेच वेळ पाळण्याच्या बाबतीतले ज्यांचे आडाखे कायमच चुकतात त्या माणसांबद्दल मला नेहमीच एक जवळीक वाटत आलेली आहे. एखाद्याचे नाक मोठे असते किंवा डोळा काणा असतो. त्याला जसा तो काहीही करू शकत नाही तसे वेळ पाळण्याच्या बाबतीत काही लोक काहीही करू शकत नाहीत. हा अवयव त्यांच्या शरीरावर उगवतच नाही. आजची तारीख किती, वार कोणता हे मी आत्ता तुम्हाला विचारले आणि तुम्हाला लगेच आठवले असेल तर तुम्ही यापासून मुक्त आहात. पण रोजची तारीख लक्षात राहणे, किती वाजलेत हे लक्षात राहणे या आपल्याला वाटतात तितक्या सोप्या गोष्टी नाहीत. वेळ न पाळण्याबद्दल ज्यांची तक्रार केली जाते ते या तारीख, वार या चक्रातून मुक्त असतात. त्यांना या गोष्टी दखल घेण्याजोग्याच वाटत नाहीत आणि त्यामुळेच ते घडय़ाळालाही स्वत:ला बांधून घेत नाहीत. काटेकोर वेळ पाळण्यासाठी मेंदूचा एका विशिष्ट प्रकारे विकास व्हावा लागतो. अमुक एक ठिकाणी तुम्हाला अमुक एका वेळेला पोहोचायचे असेल, तर खूप सारी गणिते तुमच्या डोक्यात तुम्हाला आधी सोडवावी लागतात. कसे जाणार, जायला किती वेळ लागेल, पार्किंगला किती वेळ लागेल, तिथून पुढे किती अंतर आहे, ट्रॅफिक असेल की नसेल? हे सारे प्रश्न वेळ न पाळणाऱ्याच्या मनातच येत नाहीत.

वेळ पाळण्यासाठी काय करायला हवे याबद्दल मी नेहमीच खूप विचार करीत आलो आहे. एखाद्याने किती वाजता येतोस, असा प्रश्न विचारला की मी लोकलज्जेस्तव काही तरी वेळ सांगतो. पण त्याला काहीच अर्थ नाही हे मलाही कळत असते. एखाद्याला वेळ द्यायची, तर तुम्हाला तुमचा दिवस आधी डोळ्यासमोर यायला हवा. सकाळी काय करायचे, दुपारी काय करायचे, रात्री काय करायचे, याचा काही तरी आराखडा तुमच्या किमान मनात तरी तयार असायला हवा. माझ्यासारख्या अनेकांच्या मनात मुळात असा काही आराखडा तयारच होत नाही. आपल्याकडे जर भरपूर मोकळा वेळ असतो तर दुसऱ्याकडेही तो नक्कीच असणार, असे शुभविचारच कायम मनात असतात. त्यामुळे किती वाजता भेटायचे, या प्रश्नाचे उत्तर शोधणे खूप अवघड जाते.

काही दिवसांपूर्वी चीनमध्ये फिरत होतो. माझ्याबरोबर माझी मुलं आणि बायकोपण होती. आमच्याबरोबर आमची एक सहकारी आर्किटेक्ट स्थानिक चिनी मुलगी होती. माझ्या दुसरीतल्या मुलीने काही तरी प्रश्न तिच्या मोडक्यातोडक्या इंग्रजीमध्ये त्या आर्किटेक्ट मुलीला विचारला, तर ती हमसूनहमसून रडायलाच लागली. बराच काळ ती का रडतेय हे कळेचना. नंतर कळाले.. ‘‘बघा ना सर, तुमची मुलगी किती लहान आहे, पण ती कशी छान इंग्रजी बोलतेय! मी तर किती मोठी आहे, मी आता अजून किती वर्षे इंग्रजी शिकू? मला आता कधीच इंग्रजी बोलायला येणार नाही असे वाटायला लागलेय,’’ असे म्हणून ती पुन्हा हुंदके द्यायला लागली. जगात ज्या लोकांना इंग्रजी शिकणे सगळ्यात अवघड जाते त्यातले एक चिनी लोक आहेत. त्यांच्या भाषेत अक्षर, शब्द, वाक्य अशी रचना नाहीये. तिथे खूप सारी चिन्हेच असतात, ज्याचे विविध अर्थ उच्चारानुसार आणि वाक्यात ते कुठे वापरले आहे त्यानुसार ठरतात. त्यामुळे अक्षर-शब्द-वाक्यवाली कुठलीही भाषा त्यांना शिकायला जड जात असावी, असे माझे आकलन आहे. तिच्या दु:खाशी मी स्वत:ला रिलेट करू शकतो. काही काही गोष्टी शिकणे खरेच कठीण असते. आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला ती गोष्ट नाही म्हणजे नाही शिकता येत. वेळ पाळणे ही माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या अनेकांसाठी अशी गोष्ट आहे. मी डायरी ठेवून पाहिली, मोबाइलवर नोंदी करून पाहिल्या, दिवसाच्या कागदी पट्टय़ा बनवून त्यात नोंदी करून पाहिलंय, रिमाइंडर लावले.. मात्र कशाचाही उपयोग झाला नाही.

शेवटी निलाजरेपणा या मूलभूत मानवी प्रेरणेनेच थोडा रिलीफ मिळाला. निलाजरेपणा हे माणसाला लाभलेले एक फार मोठे वरदान आहे. वेळ पाळण्याच्या बाबतीत हा निलाजरेपणा माझ्यात नसता, तर वेळेवर पोहोचलो नाही म्हणून बाराही महिने जगापुढे शरमिंदा होत बसण्यातच माझा खूप सारा वेळ गेला असता आणि कदाचित पश्चात्तापामुळे माझ्यावरही त्या मुलीसारखी वारंवार हुंदके देत बसायची वेळ आली असती. या नुसत्या कल्पनेनेही निलाजरेपणाच्या या वरदानाबद्दल माझ्या मनात अपार कृतज्ञता दाटून आली आहे. आपल्याकडे नेहमीच जे दुर्मीळ असते त्याचा गवगवा फार होतो. खरं म्हणजे, वेळा पाळणारे काटेकोर लोक हे संख्येने फार कमी असतात, बाकी गठ्ठय़ाने सगळे माझ्यासारखेच भोंगळ, अघळपघळ असतात. पण वेळा पाळणाऱ्यांना आणि त्यांच्या काटेकोरपणाला जगात अवास्तव प्रतिष्ठा प्राप्त झालीये. त्यामुळे काही थोडे काटेकोर लोक काटेकोरपणाचा गर्व बाळगत असतात, तर उर्वरित माझ्यासारखे काटेकोर नसल्याचा गंड बाळगत असतात, हे अगदीच दुर्दैवी आहे. वेळा पाळण्यालाही महाराष्ट्रात एक प्रादेशिक अहंकार आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून तुम्ही जसजसे उजवीकडे सरकता तसतसे वेळ पाळण्याचा आग्रह लोकांचा कमी होत जातो; किंबहुना मुंबई आणि थोडेफार पुणे सोडले, तर बाकी कोणालाही हे उगा वेळ वगैरे पाळायचे अवडंबर आवडत नाही.

तुम्ही नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, नगर इथल्यांपैकी कोणालाही ही असली वेळ वगैरे पाळायची थेरं करताना पाहणार नाही. मला जेव्हा पहिल्यांदा कळले की, ठरलेली लोकल चुकली तर मुंबईचे लोक हळहळतात आणि त्यांचे पुढचे गणित बिघडते, तेव्हाच मी मुंबईला जायचे नाही हे ठरवून टाकले होते. ८.१८ ची फास्ट काहीही करून पकडायची, नाही तर ऑफिसला पोहोचायला उशीर होतो.. हे फार कठीण आहे! मी साडेआठला निघू शकतो किंवा अगदी आठलाही निघू शकतो, पण ८.१८ ला नाही पोहोचलो तर हातातली मोठीच संधी हुकल्यासारखा कांगावा मुंबईकर करतात. आमच्यासारख्यांना खरे तर मिनिटाच्या अंतराने हातातून निसटून जाणाऱ्या संधीला साधावेसेदेखील वाटत नाही. ८.१८ ची स्लो किंवा ९.१२ ची फास्ट ही गणिते कधी जमावी उर्वरित महाराष्ट्रातल्या लोकांना? आणि त्यांनी ती जमवून तरी का घ्यावी? वेळ न पाळणारा माणूस अगदी निधडय़ा छातीचा असतो असाच माझा अनुभव आहे. मुळात वेळ पाळण्याच्या अट्टहासापाठी एक भय असावे. आपण वेळ पाळली नाही तर आपल्या हातातून एखादी संधी निघून जाईल, असे ते अव्यक्त भय असते. त्यामुळे तो जीव काढून ती संधी साधण्याचा प्रयत्न करतो. वेळ न पाळणाऱ्यांना संधीबिंधी हातातून जाईल असली फुटकळ भीती कधी वाटतच नाही. जग हे संधीने भरलेले आहे, त्यामुळे वेळेवर गेले तर संधी साधली जाईल वगैरे काही त्यांना वाटतच नाही. त्यांना नेहमीच वाटते, की ते जेव्हा केव्हा बाहेर पडतील तेव्हा संधी उभी असेल व बहुतांश वेळेला तसेच होते, हा त्यांचा अनुभव असतो.

वेळ पाळायला सांगितले तर इतका धसका का बसतो? हा प्रश्न जेव्हा मी स्वत:ला विचारतो तेव्हा या सगळ्याची मुळे मी ज्या नाशिकमधून येतो त्यातही दडलेली आहेत. तुम्ही कोणीही नाशिकच्या बाबतीत हा प्रयोग करून बघा. नाशिकवाल्यांना फोन करा आणि पुढील प्रश्न विचारा :

कधी भेटायचे? – भेटूयात ना! नक्की भेटूयात.

नक्की म्हणजे कधी? – उद्या-परवा भेटू.

उद्या की परवा? – कधीही चालेल.

ठीक आहे, मग परवा किती वाजता? – दुपारी किंवा संध्याकाळी भेटू.

दुपारी की संध्याकाळी? – संध्याकाळी.

कधी? – पाच-सहा वाजता भेटू.

पाच की सहा? फोन कट!

नेमकी वेळ ठरवणे हे माझ्यासारख्या जवळजवळ सगळ्याच नाशिककरांना जड जाते. एखादा जर भेटीची वेळ ठरवण्याच्या बाबतीत खूप काटेकोर व्हायला लागला तर आम्हाला त्याचा आमच्यावर विश्वास नाहीये का, असे वाटते आणि आम्ही चिडतो. त्यात चिडण्यासारखे काय आहे, असे प्रश्न लोकांना पडतात. पण वेळेच्या बाबतीत एखादा नेमका अचूक व्हायला लागला, की तो खिंडीत गाठून कोंडी करतोय असेच विचार मनात येतात त्याला काय करणार? मी नेहमी सांगतो, की आमच्या नाशिकचे लोक खूप चांगले आहेत, पण त्यांना आगीच्या बंबावर किंवा अ‍ॅम्ब्युलन्सवर ड्रायव्हर म्हणून घेऊ  नका. तुमच्याकडे आग लागली म्हणून तो घाईने बंब घेऊन अजिबात निघणार नाही. तो त्याच्याच वेळेला निघेल आणि त्याच्याच वेगाने पोहोचेल. तुमच्याकडे आग लागली म्हणून त्याला तुम्ही घाई केलीत तर त्याला ते अजिबात आवडणार नाही. मागे एकदा इमर्जन्सी पेशंटला मुंबईला न्यायचे होते. ताबडतोब जायचेय सांगितल्यावर ड्रायव्हर परवा जाऊ  म्हणाला! डॉक्टरने दम देऊन त्याला जायला भाग पाडले, तर त्याने कसारा घाटात चहा प्यायला गाडी थांबवली आणि तो निघायचे नावच घेईना. शेवटी पेशंटने एका हातात सलाइन व एका हातात स्टीयरिंग धरून गाडी चालवत नेली आणि जे. जे. रुग्णालयात जाऊन स्वत:च जमा झाला. या किस्स्यावर जवळजवळ कोणाचाही विश्वास बसणार नाही, पण नाशिकवाल्यांना हे नक्की झाले असेल याची खात्रीच पटेल. किंबहुना याच उदाहरणाने ते तुम्हाला पटवून देतील, की पेशंटला स्वत: गाडी चालवता येत होती तर मग इमर्जन्सी आहे म्हणून घाई का केली? तुम्हाला असेच किती तरी किस्से महाराष्ट्रातल्या सगळ्याच शहरांच्या बाबतीत ऐकायला मिळतील. मराठवाडा आणि विदर्भातले लोक जेव्हा एकमेकांना वेळ देतात, की आपण १२ वाजता भेटूयात, तर त्याचा अर्थ आपण १२ वाजता सोडून कधीही भेटूयात असा असतो आणि मुख्य म्हणजे, त्यात कोणालाच काही खटकत नाही. ते एकमेकांना वेळ देतात तेव्हा त्याचा अर्थ कधीतरी भेटूयात इतकाच असतो आणि ते कधीतरी भेटतातच. मध्यंतरी मला ‘ह्य़ुबलो’चे घडय़ाळ घ्यायचे होते, तर माझ्या मित्रांनी माझा खूप उपहास केला. वेळ जर पाळायचीच नसेल तर उगा महागडय़ा घडय़ाळाचा खर्च करण्यात काय अर्थ आहे, असा त्यांचा युक्तिवाद होता. ‘अरे, वेळेशी संबंध नाही. एक दागिना म्हणून मला ह्य़ुबलो घ्यायचेय,’ असे सांगितले तरी त्यांना तो पैशाचा अपव्यय वाटला. घडय़ाळापेक्षा मी आधी कॅलेंडर जरी पाळायला शिकलो तरी खूप झाले, हा सल्ला तर जवळजवळ प्रत्येकानेच दिलाय. वेळ न पाळणारी माणसे जणू काही या जगात जगायलाच लायक नाहीत, असा एकूण उर्वरित जगाचा आविर्भाव असतो. काटेकोर, परीटघडीचे आयुष्य जगणाऱ्यांबद्दल आम्हाला खूप आदर आहे, फक्त आम्हाला तसे जगता येत नाही, हे इतरांनी समजून घेतले पाहिजे. वेळ न पाळू शकणारे आम्ही लोक रमतगमत जगण्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळे वेळ दिलीये म्हणून आम्ही हे रमणे सोडू शकत नाही. तुम्ही आम्हाला सारखे वेळ पाळण्यावरून बोलणे बंद करा. आम्हाला गंड देण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. आमच्याबरोबर जगण्याची तुम्ही सवय करून घ्या, नाही तर आम्हाला वेगळा देश काढून द्या. एकाच देशात तुमच्याबरोबर जगणे आम्हाला दिवसेंदिवस कठीण होत चाललेय.

मंदार भारदे

mandarbharde@gmail.com