21 August 2017

News Flash

बायकोचे आडनाव

लग्नानंतर माझ्या बायकोचे नाव किंवा आडनाव बदलायला माझा विरोध होता.

मंदार भारदे | Updated: July 30, 2017 3:23 AM

लग्नानंतर माझ्या बायकोचे नाव किंवा आडनाव बदलायला माझा विरोध होता.

आडनावे ही टॉन्सिलसारखी असतात. प्रत्येकजण आपल्या जन्माबरोबरच ते घेऊन येतो. माणसाच्या शरीरात टॉन्सिल का असतात, याचे कोणतेही सुसंगत कारण अद्याप सापडलेले नाही. माणूस मरेपर्यंत हा अवयव बाळगतो. टॉन्सिल जर त्रास द्यायला लागले तर ताबडतोब ऑपरेशन करून ते काढून टाकतात. ते काढून टाकल्याने जीवाला कसलाही धोका संभवत नाही. आणि वर ऑपरेशन झाल्यावर बराच काळ आईस्क्रीम खायला देतात. आडनावाचे तरी दुसरे काय आहे? जन्मापासून माणसाला ती चिकटलेली असतात आणि टॉन्सिलसारखीच ती अनावश्यकही असतात. कोणीही मागणी न करता जसे आपल्याला टॉन्सिल मिळते, तसेच आडनावही. परंतु गंमत अशी, की घशात खवखवायला लागले की टॉन्सिल काढून फेकून देता येते, तसे त्रास द्यायला लागले की तितक्याच सहजपणे आडनाव काढून फेकून देता येत नाही. टॉन्सिलला कोणी गोत्र विचारत नाही. ‘टॉन्सिल म्हणजे तुम्ही नेमके कोण?’ या प्रश्नाला त्याला सामोरे जावे लागत नाही. ‘आमच्या शेजारी एक टॉन्सिल राहायचे, पण ते आपल्यापैकी नाहीत,’ अशी वर्गवारी कोणी करत नाही. स्वत:च्या आडनावाचा अभिमान आणि दुसऱ्याच्या आडनावाचे अर्थ लावायचे कुतूहल कमी व्हायला लागले की माणूस थोडा बरा बनायला लागतो असा माझा तरी अनुभव आहे. त्यामुळे आडनावापासून मुक्ती सध्या जरी शक्य नसेल, तर निदान त्याचे अर्थ लावण्यापासून तरी दूर आपण राहायला हवे असे मला वाटते.

त्यामुळे लग्नानंतर माझ्या बायकोचे नाव किंवा आडनाव बदलायला माझा विरोध होता. लग्न झाले म्हणून फक्त तिचेच आडनाव का बदलायचे, याचे कोणतेही कारण तेव्हा मला माहीत नव्हते आणि आजही माहीत नाही. आम्ही जेव्हा लग्न करायचे ठरवले तेव्हा सगळेजण माझ्या बायकोला किमान तिचे आडनाव बदलायला सांगतील याबद्दल मला खात्रीच होती. मी तिला ‘तुझे आडनाव बदलण्याबद्दल तुझे काय मत आहे?’ असे विचारले तेव्हा तिने ‘त्याबद्दल मी कधी विचारच केला नाही,’ असे उत्तर मला दिले.

‘नाही म्हणजे ते आता बदलेलच असे तू गृहीत धरले होतेस का?’

‘हो! ते तर बदलतेच ना?’

‘तुला तुझे आडनाव आवडत नाही का? किंवा माझे आडनाव तुला जास्त भारी वाटते का?’

‘छे! असे अजिबातच नाही. आणि माझे आडनाव जसे पण आहे ते ठीक आहे. गेली अनेक वर्षे माझ्या ते सवयीचे आहे.

‘मग तुला ते का बदलायचे आहे लग्नानंतर?’

‘अरे, ते तर बदलतेच ना?’

‘नाही. तसे करण्याची काहीही गरज नसते. शाळा सोडल्याच्या दाखल्यावर आपले जे नाव आहे, तेच आपले नाव आणि आडनाव.

‘अरे, पण लग्न केल्यावर त्यात बदल नाही का होणार?’

‘आपोआप कसा होईल बदल? आपल्याला आवर्जून जाऊन तुझी कागदपत्रे बदलून घ्यायला लागतील. आणि आपले नाव किंवा आडनाव कोणीही बदलू शकतो. तो ते काहीही ठेवू शकतो. माझा जर मूड झाला तर ‘हिटलर भारदे’ किंवा ‘मंदार पुतिन’ असा काहीही बदल नावात करता येतो. पण लग्न झाले म्हणजे नाव बदललेच पाहिजे अशी काहीही सक्ती नाही.’

‘तू सभेत बोलल्यासारखा बोलू नकोस. तुझे काय म्हणणे आहे?’

‘आपल्याकडे फक्त स्त्रीचे आडनाव लग्नानंतर बदलतात. तिने तिची ओळख पुसून टाकावी आणि नव्या आयुष्याला सामोरे जावे अशी कल्पना त्यामागे आहे. हे खूपच पुरुषसत्ताक आहे. मला असे करायला आवडणार नाही. मला असे मनापासून वाटते, की तू आडनाव बदलू नयेस! ठीकाय!’

लग्नापूर्वी काही दिवस माझ्या बायकोला माझ्या सगळ्या गोष्टींना पािठबा द्यायची सवय होती. नंतर तिची ही सवय सुटली. पण तेव्हा तरी तिने माझे ऐकायचे ठरवले. ज्यावेळी आम्ही सगळ्यांना आमचा हा निर्णय कळवला तेव्हा आम्ही कल्पनाही केली नव्हती असे फटाके आमच्या आजूबाजूला फुटायला लागले.

‘कसली स्त्रीची ओळख पुसली जाते? आमची काय ओळख नाहीये का समाजात? नस्ती थेरं करायची! आपल्या घरातल्या इतक्या जणींनी लग्नानंतर नाव बदलले.. त्यांचे काय वाईट झाले? आणि तिच्या घरात नाही का लग्नानंतर नाव बदलत? मग तुम्हालाच काय हे भिकार षौक सुचताहेत?..’ अशा शब्दांत अगदी जवळच्या स्त्रियांनी निषेध केला. सगळ्याच जणी माझ्या जवळच्या. ‘तुम्ही तुमचे नाव बदलून तुमची ओळख पुसून टाकली आहे,’ असे काही मला त्यांच्या बाबतीत म्हणायचे नव्हते. त्यातल्या अनेकजणींचा घरातला ‘वरदहस्त’ मला माहीतच होता. त्यांना मी ओळखून होतो. त्यामुळे त्यांची ओळख पुसली गेल्याचा आरोप मी त्यांच्यावर करू शकत नव्हतो. काहीजणी खरोखरच आपल्या संसारात विरघळून गेल्या होत्या. आपली सगळी ओळख पुसून टाकून स्वत:ला घरासाठी आणि घरातल्यांच्या सुखासाठी समर्पित करणे हाच त्यांचा सर्वोच्च आनंद होता. त्यांना तुम्ही तुमची ओळख पुसून टाकली आहे, हे ऐकवणे क्रौर्याचे ठरले असते.

बऱ्याच मित्रांनी मला जाब विचारला.. ‘कशाला हे रिकामे धंदे करतोस? जसे आहे तसे चालू दे ना!’ मी जीव खाऊन हिरीरीने त्यावर चर्चा करायचो.. ‘का तिने माझे आडनाव लावायचे? समाजात आपल्याकडे फक्त बाईला लग्नानंतर नाव बदलायला लावतात. आणि तेही विनाकारण! हे वाईट आहे.’

‘तू फक्त लग्न कर ना! समाजाला संदेश कशाला द्यायला जातो आहेस लग्नातून?’ असे म्हणून जवळच्या मित्रांनी माझा उद्धारच केला.

‘आडनावाची मला अजिबात लाज वाटत नाही. चारचौघांत आडनाव सांगायला लाज वाटावी असे आम्ही किंवा आमच्या पूर्वजांनी काही केल्याची माझी माहिती नाही. पण काहीच कारण नसताना दुसऱ्या आडनावाच्या मुलीने माझे आडनाव का लावायचे?’ इतकाच माझा प्रश्न होता.

‘ठीक आहे बच्चू, तू काही माझे ऐकणार नाहीस. आता भोग आपल्या कर्माची फळे!’ असा आशीर्वाद माझ्या एका मित्राने दिला. ती फळे म्हणजे नेमके काय, ते मला आत्ता कळते आहे.

काही दिवसांपूर्वी माझ्या एका जवळच्या नातलगाने माझ्या बायकोला विचारले की, ‘तू अजूनही आपले आडनाव का बदलले नाहीस?’

आमच्या लग्नाला आता बरीच वर्षे झाली आहेत. या प्रश्नाची तिला आता सवय झाली आहे. पूर्वी आम्ही प्रत्येकाला अर्धा-अर्धा तास स्पष्टीकरण द्यायचो. आता पाच मिनिटांत विषय कसा संपवायचा, हे आम्हाला कळायला लागले आहे. त्याप्रमाणे तिने विषय संपवला. मग महोदय तिला म्हणाले, ‘स्त्रीची ओळख वगैरे काही नाही, प्रॉपर्टीमध्ये तुझे नाव लागू नये म्हणून खेळलेली ही एक चाल आहे. तुला समजत नाहीये. वेळीच जागी हो.’

आम्ही नवीन घरात राहायला गेलो आणि बाहेर तिचे आणि माझे नाव आडनावासकट दरवाजावर लावले तर तिच्या एका नवीन मैत्रिणीला वाटले की, आम्ही लग्न न करता एकत्र राहतो आणि ती आमची जॉइन्ट प्रॉपर्टी आहे म्हणून दोन आडनावे दरवाजावर लिहिली आहेत.

मुलाचे बर्थ सर्टिफिकेट आणायला बायको गेली तेव्हा तिने तिचेही आडनाव लिहिण्याचा आग्रह धरला. तर तिथल्या महिलेने चक्क नकार दिला. ‘तू घटस्फोटित आहेस का?,’ असे विचारले. ‘नाही. आमचा संसार चांगला चालला आहे,’ असे हिने सांगितल्यावर ‘मग नवऱ्याची लाज वाटते का?’ असे तिने विचारले. ‘तुम्ही तुमचे काम करा..’ असे बायकोने तिला सांगितल्यावर ‘तुम्हाला मोठय़ा साहेबांची परवानगी आणावी लागेल,’ असे सांगून तिने तब्बल दोन महिने बर्थ सर्टिफिकेट दिले नाही.

बँकेत गेल्यावर तिथल्या एका प्रौढ महिलेने- ‘तुझ्यासारख्या मुली काहीतरी खुळ्यासारखे करतात, आणि मग चांगल्या घरातल्या मुली बहकतात..’ असे तिला म्हटले.

आम्ही ‘बर्वे-इनामदार’सारखा मध्यम मार्ग स्वीकारावा, हा सल्ला तर जवळजवळ प्रत्येकानेच दिला.

आम्हाला सगळ्यात जास्त त्रास माझ्या बायकोचा पासपोर्ट काढताना झाला. ‘मी माझ्या नवऱ्याबरोबर सुखाने नांदते आहे. आम्ही एकाच घरात राहतो. फक्त मी माझ्या नावाने.. आणि तो त्याच्या नावाने,’ हे समजावून सांगताना आम्हाला नाकी नऊ  आले.

सरकारी कार्यालयात मध्यम वयाचा माणूस टेबलाच्या पलीकडे बसलेला असेल तर बायकोच्या अंगावर काटाच येतो. आणि मध्यम वयाची बाई असेल तर माझ्या बायकोचे काम होणे जवळजवळ अशक्यच होऊन बसते.

आम्ही भारताबाहेर फिरायला जातो तर आम्हाला व्हिसा लगेच मिळतो, पण भारतातला  इमिग्रेशनवाला डोळे मोठे करतो. रेशन कार्डावर आम्ही सगळे आहोत; पण तिच्या आडनावासकट ती नाही. बँकेत जॉइंट खाते उघडायला, एफडी करायला अतोनात त्रास होतो. माझ्या बायकोच्या पर्समध्ये अटेस्टेड केलेला लग्न नोंदणी दाखला कायम असतो. कारण जवळ जवळ प्रत्येक ठिकाणी तिला तो द्यावा लागतो.

माझ्या एका नवीन व्यापारी मित्राला जेव्हा कळले, की माझी बायको तिचेच आडनाव लावते, तेव्हा त्याने प्रेमाने माझा हात हातात घेतला आणि ‘टॅक्स चुकवायची ही चांगली आयडिया आहे. कच्चावाला पैसा भाभी के मायकेवाले नाम पे रखो और पक्कावाला इधर के नाम पे रखो,’ असा मोलाचा सल्ला दिला.

कविताच्या एका क्लायंटने (जो मला कवितामुळे ओळखतो.) एकदा माझी ओळख ‘मंदार भालेराव’ अशी करून दिली. ती ‘भालेराव’ आहे म्हणजे मीही ‘भालेराव’च असणार याबद्दल त्याला खात्रीच होती. आणि त्यात त्याचा तरी काय दोष? आम्हाला जेव्हा मुलगी दत्तक घ्यायची होती तेव्हा आम्ही बेजबाबदार पालक तर नाही ना, याच संशयाने आमची मुलाखत घेतली गेली आणि आमचे सांसारिक संबंध चांगले आहेत हे आम्हाला पुन: पुन्हा पटवून द्यावे लागले. आम्ही समाजात काही बदल करायला निघालो नव्हतो. व्यक्ती म्हणून माझ्या बायकोबद्दल माझ्या काही आदराच्या कल्पना होत्या- ज्या मी तिच्याशी शेअर केल्या.. तिला पण त्या स्वीकाराव्याशा वाटल्या.. खरं तर इतकेच या निर्णयामागे होते. ‘नावात काय आहे?’ या प्रश्नावर कविता आता बराच वेळ बोलू शकेल. माझ्या नाव न बदलण्याच्या हट्टाची खरी किंमत तिनेच मोजली. या सर्व काळात आम्हाला थोडासा त्रास नक्कीच झाला; पण आमचे काही चुकले आहे असे मात्र अजिबात वाटत नाही. सोपे सोपे कागद मिळवताना कविताला खूप त्रास होताना मी पाहतो. आणि खोटं का बोलू? आपण हे सारे विनाकारण तर आपल्या आयुष्यात आणले नाही ना, असे प्रश्न पडायला लागतात..

परवा माझ्या मुलाला शाळेत बक्षीस घेताना स्वत:ची ओळख करून द्यायला सांगितले तेव्हा त्याने ‘माझे नाव- आद्य.. माझ्या बाबाचे नाव- मंदार भारदे.. आणि माझ्या आईचे नाव- कविता भालेराव’ अशी जोरदार ओळख करून दिली तेव्हा समोरच्या लोकांच्या डोळ्यांत मला थोडासा गोंधळ दिसला; पण आमच्या मुलाच्या मनात आईच्या ‘नावाबद्दल’ थोडाही गोंधळ नव्हता.

आमच्या या छोटय़ाशा खाजगी तपाला बहुधा बरी फळं लागताहेत.

मंदार भारदे mandarbharde@gmail.com 

First Published on July 30, 2017 3:23 am

Web Title: author mandar bharde article on wife surname
 1. B
  bhikchand lande
  Aug 6, 2017 at 4:53 pm
  सर, खूप भारी अनुभव आहे तुमच्याकडे. या सगळ्याची किंमत चुकवावीच लागणार आहे. कारण हा बौद्धिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांचा देश आहे.
  Reply
 2. D
  dhananjay
  Aug 6, 2017 at 4:42 pm
  ा हे अजिबात पटत नाही आपण वैयक्तिक विचार करत आहात हे समाजा साठी घातक आहे रूढी परंपरा अनेक वर्ष्याच्या अनुभवाने तयार होतात त्या तोडल्या मन्हजे शूरता नाही फार लांब जाऊ नका केवळ जन्म देणाऱ्या आई शिवाय मुलाचा बाप कोण हे सांगता येणार नाही तरी समाज म्हणून ते नाव सोयीचा असत आणि कर्तृत्व असेल तर नाव ही अडचण असू नये अगदी मुलाचं नाव दगड किंवा मुलीचं माती ठेवलं म्हणून कर्तृत्व दाखवताना अडचण येत नाही किती तरी मुलीची नावं नाखुषी असंच होतं त्यांचं आयुष्य संपलं नाही तेव्हा हा समाजाच्या सोयीचा विचार आहे असा विचार ठेवा उगाच भंपक सुधारणा नकोत
  Reply
 3. U
  umesh
  Aug 6, 2017 at 4:18 pm
  पांचट लेख पत्नीचे आडनाव बदला नाही तर नका बदलू तो तुमचा खासगी प्रश्न आहे त्याची धुणी इथे धुवून आमच्या डोक्याला का ताप? ज्या महिला पतीचे आडनाव लावतात त्यांनाही असाच त्रास होतो बाकी तुम्ही किंवा तुमची पत्नी काय आडनाव लावते यात लोकसत्ताच्या हजारो वाचकांना रस असेल असे तुम्हाला कसे वाटले हेच एक आश्चर्य आहे
  Reply
 4. A
  Ashok Jagannath
  Aug 1, 2017 at 3:06 am
  ऐकायला, वाचायला, बघायला अशा गोष्टी बऱ्या वाटतात जसे, प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहून किनाऱ्याला सुखरूप पोहोचणाऱ्या पाण्यातल्या तरणपटूसारखे. पण अशा स्वकृतीचा स्वानुभव घ्यायला मात्र मन धजत नाहीं, हेच खरे. पाण्यात राहून माशासी वैर कशाला, हा प्रश्र्नार्थक विचार मनांत डोकावून, आपण जन्माल घातलेल्या मुलांच्या भविष्याळांतील अडचणींचे डोंगर आपल्या समोर उभे राहतात. ा अमेरिकेतल्या डॅलसमध्ये मराठी मंडळाच्या सभेत एक वक्ता ऐकायला मिळाले . त्यांचे नांव व त्यांच्या वडिलांचे एकच होते जसे - - "वसंत वसंत". वक्त्याने त्याच्या ह्या नांवाची कथा श्रोत्यांना ऐकवली. घरांतील एका अतिशय वृद्ध आजोबांना सांगितले, मुलगा झाला हो ! नांव सुचवा, म्हणून विनंतीही केली. ताबडतोब त्यांनीहि सुचवले "वसंत". त्यानां सांगितले दुसरे नांव सुचवा कारण मुलाच्या वडिलांचे नांव देखील 'वसंत'च आहे. पण आजोबा म्हणाले, "एकदा मजकडून वदले गेले,ते गेले. आता त्यात बदल नाहीं. मग त्याला "बाळू" हे टोपण नांव पडले. वक्त्याच्या नांवाबाबत घडलेला प्रसंग ऐकायला मजा आली. पण त्याचवेळीं त्या वक्त्याच्या मातोश्री माझ्या समोर उभ्या राहिल्या. बिच्चारी !!
  Reply
 5. K
  Ketaki Purkar
  Jul 31, 2017 at 12:28 am
  अनोखा आणि उत्तम प्रयोग. पत्नीच्या स्वतंत्र ओळखीबद्दलचा केलेला आदरयुक्त विचार खरोखर भावला.
  Reply
 6. S
  Sneha Ketkar
  Jul 30, 2017 at 11:27 am
  अप्रतिम लेख!!!! ा हे सगळे विचार पटले. येणाऱ्या काळात स्त्रीला तिचे नाव आडनाव बदलावे लागणार नाही अशी आशा करुया.
  Reply
 7. D
  Diwakar Godbole
  Jul 30, 2017 at 11:13 am
  माझ्या मुलाचे लग्न झाल्याला आता १३ वर्षे होऊन गेली आहेत.सुनेचे वडील सून शाळेत शिकत असतानाच अचानक निवर्तले.त्यानंतर तिच्या आईने तिचे अभियांत्रिकी पदवी पर्यंत सर्व शिक्षण स्वकष्टावर संसार चालवून केले.आईनेच आईवडील अशा दोन्ही भूमिका समर्थपणे पेलल्यामुळे मुलाच्या लग्नात करावे लागणारे सर्व धार्मिक विधी सुनेच्या आईने केले तर आम्हाला आनंद वाटेल असे मी सुचविल्यामुळे त्यांनी त्याप्रमाणे कार्यक्रमामध्ये भाग घेऊन धार्मिक विधी केले,रूढ प्रथेप्रमाणे लग्नात वधूला वडील नसतील तर नात्यातील जी पुरुष व्यक्ती अशा विधींना अधिकारी म्हणून मानतात अशी सुनेच्या माहेरची व्यक्ती नाराज झाली आणि त्यांचा आमच्याशी संपर्क वाढलेला नाही.गेली १३ वर्षे मी आणि माझी पत्नी मुलगा सून ह्यांच्याबरोबर पुणे सोडून येथे आनंदात राहत आहोत.बोलण्याच्या ओघात येथील शेजाऱ्यांशी हि गोष्ट सांगितल्यावर त्यांना आजदेखील ह्याचे आश्चर्य वाटते.
  Reply
 8. Load More Comments