ग्लोबलायझेशनच्या अनेक दुष्परिणामांना आज आपण सामोरे जातो आहोत. ग्लोबलायझेशनमुळे आपण काय गमावून बसतो आहोत, हे माझ्या वाचकांना सांगणे हे मला माझे कर्तव्य वाटते. मलाच काय, पण तुम्हालाही तुमच्या इंग्रजीच्या सरांनी आणि गेला बाजार अगदी तर्खडकरांनीही ‘श्येडुल’ असा उच्चार करायला शिकवला होता. हल्ली आपण ग्लोबल झाल्यापासून नवीनच भानगड होऊन बसलीये. हल्ली त्याला लोक ‘स्केडय़ूल’ म्हणायला लागले आहेत. ‘व्हॉट इज यूअर स्केडय़ूल?’ असे हल्ली विचारतात. हा ‘फाऊल’ आहे. जरा आत्ता आत्ता कुठे वाघिणीच्या दुधाचा चहा प्यायला मजा यायला लागली होती तर या ‘स्केडय़ूल’ने मोठी आणि नवीनच भानगड उभी करून ठेवलीये. या जागतिकीकरणाच्या गदारोळात जरा कुठे आवरून- सावरून बसावे, तर सारखे कोणीतरी, कुठूनतरी येतात आणि खालची सतरंजी ओढून नेतात. जागतिकीकरण म्हणजे जगभरातल्या सगळ्यांनी भांबावल्यासारखे भरकटायचे आणि एकदा सगळ्यांना एकत्र भोवळ आली की जागतिकीकरण सुफळ संपूर्ण होईल असे मला हल्ली वाटायला लागले आहे. बरे, कुठे बोलताही येत नाही. आपण लोकांना सांगितले, की बाबांनो, जरा थांबा, कुठे निघाला आहात एवढय़ा घाईने- हे जरा स्थिर चित्ताने बघा.. तर लोकांना राग येतो आणि मग आपण विकासाचे विरोधक आहोत असे लोक बोलायला लागतात. तेव्हा सांगायचे तात्पर्य- ‘स्केडय़ूल’ म्हणायला लागा.. उगाच वाद नको. तर ते असो.

मला हताश वाटायला लागले त्याचे कारण दुसरेच आहे. एकाने ऑफिसमध्ये मला फोन केला. त्याची कोणती तरी वस्तू त्याला मला विकायची होती. होता असाच कोणीतरी कराड, कांबळे किंवा कुलकर्णी. तो चक्क माझ्याशी विनम्रतेने बोलला आणि माझा आत्मविश्वास डळमळीत व्हायला लागला. मराठी माणूस आणि विनम्रता यांचा काय संबंध आहे? अशी कोणती हतबलता त्याच्या आयुष्यात निर्माण झाली असावी- ज्यामुळे त्याला विनम्रतेने बोलावेसे वाटले? या प्रश्नाने मला अस्वस्थता आणली. हल्ली मोठा व्यापार करायचा असेल किंवा यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही विनम्र असायला हवे, अशी अफवा कोणीतरी पसरवली आहे. आणि मराठी माणूस जर विनम्र झाला नाही, तर त्याचा उद्धार होणार नाही अशीही भीती घालतात. त्यामुळे ज्यांना यशस्वी व्हायचे आहे ते सगळेच आता पटापट विनम्र व्हायच्या मागे लागले आहेत.

Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

माझ्या मते, मराठी माणूस विनम्र होताना जितका केविलवाणा दिसतो तितका तो हिंदी बोलायचा प्रयत्न करतानाही दिसत नाही. मराठी माणसाने का विनम्र व्हावे, याचे कोणतेही कारण मला दिसत नाही.

एक फार जुनी गोष्ट आहे. एकदा एक ऋषी घनदाट जंगलात एका झाडाखाली तपश्चर्या करत बसलेला असतो. चेहऱ्यावर मस्त तेज आणि साधनेनंतर येणारी एक मस्त बेफिकिरी. एक जगज्जेता राजा तिथून चाललेला असतो. राजांना नेहमीच एक शाप असतो. जोपर्यंत सहवासात आलेला प्रत्येकजण त्यांना झुकून नमस्कार करीत नाही तोपर्यंत त्यांना सुरक्षितच वाटत नाही. अगदी जंगलातही जे लोक राजाच्या वाटय़ाला यायचे, ते अगदी झुकून राजाला वंदन करायचे. मोठा गाजावाजा करत राजा त्या ऋषीपुढून चाललेला असतो आणि त्याला आश्चर्य वाटते, की ऋषी तर डोळे उघडूनही पाह्य़ला तयार नाही. तो मस्त आपल्या समाधीत गर्क. राजा त्याच्यासमोर जाऊन आपला रथ उभा करतो तरीही ऋषी आपला समाधीत गर्कच. राजा म्हणाला, हे ऋषी, मी तुझ्या तपश्चर्येने खूश झालो आहे! माग- तुला काय हवे ते. मी जगज्जेता आहे. तू जे मागशील ते तुझ्यासमोर मी हजर करीन. तेव्हा संकोच न करता काय वाटेल ते माग. यावर ऋषी म्हणाला, तू काय मला देणार! सकाळचे कोवळे ऊन माझ्या अंगावर पडले होते, तू माझ्या आणि उन्हाच्या मधे उभा आहेस तेवढा ताबडतोब बाजूला हो, म्हणजे माझ्या उन्हाने न्हाऊन निघण्यात व्यत्यय येणार नाही. स्वत:ला आलेले राज-प्रपोजल नाकारून इतके बाणेदार उत्तर देणारा हा ऋषी नक्कीच मराठी असणार याबद्दल माझ्या मनात जराही संदेह नाही. बेधडक बोलायचे, जे काही बोलायचे ते तोंडावर बोलायचे, आणि तडफदार बोलायला मिळणार असेल तर नुकसानीचा विचार न करता बोलायचे- हे सगळे मराठी माणसाचे गुणधर्मच आहेत. दुसरा कोणीही असता तर राजा येणार ही माहिती मिळताच मुळात तपश्चर्येला बसलाच नसता. हारतुरे घेऊन अगदी विनम्रतेने राजाला सामोरा गेला असता. आपला ऋषी मराठी असेल म्हणून त्याने विनम्रतेने वागण्यापेक्षा बाणेदारपणे वागून राजाला घालवून दिले असावे.

राष्ट्रीय नेत्यांचे अनेक किस्से आपल्याला माहिती आहेत. आपण त्यांची अधूनमधून चर्चाही करत असतो. पण आपल्याला सगळ्यांना माहीत असणारा आणि सतत चर्चेत असणारा किस्सा एकच.. लोकमान्यांचा.. ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही’वाला. आपण लोकमान्य होऊ  अथवा न होऊ ; पण आपल्याला नेमका संदेश या घटनेने मिळालेला आहे.. तोंडावर सुनावून टाकायचे! शेंगा खाल्ल्या नसतील तर टरफलांशी आपला संबंध नाही. उगाच पड खायची नाही. मला सांगा- विनम्रतेची गणिते डोक्यात असतील तर असली बाणेदार उत्तरे सुचतील तरी का? तोंडावर बोलून टाकणे हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. तो त्याचा श्वास आहे. आणि त्याला कुठल्याही कारणाने विनम्र होण्याचा आग्रह जेव्हा लोक धरतात, तेव्हा त्यामागे मला कारस्थानाचा वास येतो. मोराचा तुरा किंवा सिंहाची आयाळ ही जशी त्यांची शान आहे तसाच आपला मराठी माणसाचा उद्धटपणा ही आपली शान आहे. त्याच्या शिरपेचातील तो तुराच आहे. विनम्रतेचे परकीय मूल्य अंगीकारण्याचा प्रयत्न हा आपल्या या शानच्या खिलाफ आहे. कारस्थानी आणि लबाड माणसे आपल्या प्रांतात कमी निपजतात असा माझा अनुभव आहे. आपला तमाम प्रांत बाराही महिने अठराही काळ उद्धटपणा करण्यात इतका गर्क असतो, की त्याला तुलनेने कारस्थाने करत बसायला वेळच मिळत नाही असा माझा अनुभव आहे. उद्धटपणे बोलताना शब्दांचे जे घर्षण होते त्यातून जर कोणी वीजनिर्मितीचा प्रयत्न केला असता तर महाराष्ट्रातल्या एकेका जिल्ह्यने सगळ्या राष्ट्राला वीज पुरवली असती. अजूनही एखाद्याने प्रयत्न करून पाहायला हरकत नाही. सगळ्या राष्ट्राला फुकट वीजपुरवठा आपण करू शकू.

जी गोष्ट शब्दांच्या घर्षणाची, तीच गोष्ट लाथ मारण्याची. आपल्या उद्धटपणाची स्वाभाविक अभिव्यक्ती ही सतत कशाला तरी लाथाडण्यात आहे. ‘जास्त ऐकून घेत नाही आपण कोणाचे.. जमत असेल तर घ्या, नाही तर राहू द्या. तुमच्यावर घर नाही चालत आपलं!’ असे बाणेदारपणे आपल्या गिऱ्हाईकाला सांगणारे आणि आपण पगारासाठी काम करत नाही असे वारंवार साहेबाला ऐकवणारे नरपुंगव याच सह्यद्रीच्या कुशीत फक्त जन्माला येत असावेत. ‘अरे, लाथ मारली नोकरीवर!’ असे सांगण्यात आपल्याला जेवढा आनंद होतो, तेवढा तर नोकरी मिळाली हे सांगण्यातही होत नाही, हे नाकारण्यात काय अर्थ आहे? एखादी ऑर्डर लाथाडली, नोकरीची ऑफर लाथाडली, आपल्या अभिमानाला ठेच तर पोहोचत नाही- या शंकेने संधी लाथाडली.. अशी दिवसभर आपल्या प्रदेशात लाथाडालाथाडी सुरू असते. संधी किंवा नोकरी लाथाडण्यातून जे घर्षण होते त्यानेही वीजनिर्मिती होऊ  शकेल का, या शक्यतेचाही विचार करायला हरकत नाही.

स्पष्टपणे तोंडावर बोलून टाकण्याच्या संस्कारांमुळे हृदयरोग किंवा रक्तदाबाचा त्रास कमी होत असावा. त्याचप्रमाणे गैरसमजालाही वाव राहत नसावा असा माझा कयास आहे.

माझ्या एका मित्राने एकदा एक फार मजेशीर गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली होती. आपण लग्नाचे आमंत्रण देतानाही आपला तडफदार आणि स्पष्टवक्तेपणा सोडत नाही. पत्रिकेवर स्पष्ट लिहिलेले असते.. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे! म्हणजे काय? तुम्हाला लग्नाला यायचे तर या. नसेल यायचे, तर नका येऊ . आम्हाला काही फरक पडत नाही. आमचे कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. उगाच तुमचा काही संबंध नाही. आता इतके उद्धट आमंत्रण जगात कोणी कोणाला देत असेल असे मला तरी वाटत नाही.

मुळात आपण सगळे राकट देशा, कणखर देशातले नागरिक. सह्यद्रीच्या रांगडय़ा जमिनीवर वाढलो आणि पोसलो गेलो. आपल्याला आपल्या प्रदेशाने कधीच हतबल केले नाही. पुरेसे अन्नपाणी जवळजवळ सगळ्यांना दिले. एक खूप चांगली ओळख मराठी माणूस म्हणून मिळाली. मराठी आहे म्हणजे किमान हुशार तर असणारच. किमान धडाडी तर असणारच. आणि मुख्य म्हणजे खाऊनपिऊन सुखी असणार- अशीच साधारण मराठी माणसाची प्रतिमा आहे. अनेक विद्वान माणसे या भूमीत जन्माला आली. समाजसुधारक किंवा संत निर्माण करणे हा आपला मक्ताच वाटावा असे लोक या प्रांतात जन्माला आले. देशात फक्त आपणच आपल्या राज्याला ‘राष्ट्र’ म्हणतो. आणि नुसते राष्ट्र म्हणून थांबत नाही, तर ‘महा’राष्ट्र म्हणतो. आता इतके सगळे मुबलक असणाऱ्या लोकांकडून विनम्रतेची अपेक्षाच करणे गैर आहे. मराठी माणूस आई, बाप, शिक्षक आणि महाराज यांच्याशिवाय कोणापुढेही झुकू शकत नाही, याला तो तरी काय करणार? तुम्ही यापैकी कोणीही एक नसाल तर मराठी माणूस तुमच्यापुढे झुकू शकणार नाही. तो बाणेदारपणे  वागतो तो तुम्हाला उद्धटपणा वाटतो, ही तुमची चूक आहे. त्याला सतत स्वत:च्या भूमीचा आणि स्वत:चा अभिमान वाटत असतो- याला मग्रुरी समजणे ही तुमची चूक आहे.

आणि आता एक शेवटचे : मराठी माणसाचा अभिमान हा कशातही परावर्तित न होणाऱ्या पदार्थासारखा आहे. म्हणजे पाण्याची वाफ होते, वाफ परावर्तित होऊन त्याचे ढग बनतात. तसे कोणतेही परावर्तन मराठी माणसाच्या अभिमानाचे होत नाही. तो एक ठाम, न बदलणारा, न परावर्तित होणारा गुणधर्म आहे. मराठी माणसाचा मराठीपणाचा अभिमान हा जरी समान गुणधर्म असला तरी तो अपरिवर्तनीय आहे. त्याचे अगदी मतपेटीतही परावर्तन होत नाही.

मंदार भारदे mandarbharde@gmail.com